कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी ही अनेक लोकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन आली. यामुळे वर्षाच्या मध्यापर्यंत जगातील विविध भागातील संकटाच्या परिस्थितीमुळे आठ कोटींपेक्षा जास्त लोकांना सक्तीने स्थलांतर करावे लागले आहे. अशाप्रकारे कोविड-19 साथीमुळे शरणार्थी लोकांचे जीवन अजूनच उध्वस्त झाले आहे. यूएनच्या (UN) अहवालात ही माहिती समोर आली आहे. शरणार्थींच्या हक्कांसाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रांची संस्था यूएनएचसीआरने हा अंदाज वर्तवला आहे. 2019 च्या अखेरीस सुमारे तीन कोटी शरणार्थींसह 7.95 दशलक्ष लोक स्थलांतरीत झाले होते आणि हे जगातील लोकसंख्येच्या जवळपास एक टक्के आहे.
यूएनएचसीआरने (United Nations High Commissioner for Refugees) बुधवारी जिनेव्हा येथे याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या वर्षाच्या सुरुवातीला असे म्हटले गेले होते की, वेगवेगळ्या भागात दडपशाही, संघर्षाची परिस्थिती आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनामुळे 7.95 कोटी लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. यामध्ये 4.57 कोटी स्थलांतरीत झालेले लोक 2.96 कोटी शरणार्थी आणि इतर देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पडलेल्या 42 लाख लोकांचा समावेश आहे.
लोक युद्ध, छळ, संघर्ष आणि हिंसा यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडतात, त्यांना अनेकदा छावण्यांमध्येही खूप कष्टाचे जीवन जगावे लागते. यावर्षी मार्चमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोरोना साथीच्या दरम्यान, जागतिक युद्धबंदीची मागणी केली होती. या साथीमुळे आतापर्यंत 15 लाखाहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की, आधीपासून चालू असलेल्या संकटांमध्ये आता कोरोनाची भर पडली व यामुळे 2020 मध्ये लोकांच्या जीवनावर खूप गंभीर परिणाम झाला आहे.
अंदाजानुसार स्थलांतर करण्यास भाग पडलेल्या 7.95 कोटी लोकांमध्ये 3-3.4 कोटी मुले अशी आहेत ज्यांचे वय 18 वर्षांखालील आहे. यूएनएचसीआरच्या मते, सिरिया (66 लाख), व्हेनेझुएला (37 लाख), अफगाणिस्तान (27 लाख), दक्षिण सुदान (23 लाख) आणि म्यानमार (दहा लाख) मध्ये जास्तीत जास्त लोक स्थलांतरीत झाले आहेत.