कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव जगभरात सुरूच आहे व रोज कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी ही संख्या 3.53 कोटींच्या वर पोहोचली. तर या आजारामुळे 1,042,600 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नेत्यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीमध्ये सांगितले की, जगभरातील दर 10 पैकी 1 व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असावा. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्गाची वास्तविक संख्या जवळपास 80 कोटींच्या आसपास असू शकते. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथील मुख्यालयात डब्ल्यूएचओची बैठक झाली. यामध्ये जगभरातील देशांनी या साथीच्या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल चर्चा झाली.
डॉ. रायन यांच्या मते, शहरी आणि ग्रामीण भागात आणि वेगवेगळ्या वयोगटातील संक्रमित लोकांची संख्या वेगवेगळी असू शकते, परंतु ‘जगातील एक मोठी लोकसंख्या धोक्यात आहे’. त्यांच्या मते कोरोना साथ वाढत जाईल मात्र त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी गोष्टी उपलब्ध आहेत. डॉ. रायन म्हणाले की, दक्षिण-पूर्व आशियातील प्रकरणे बरीच वाढली आहेत. त्याच वेळी, अधिक मृत्यू युरोप आणि पूर्व भूमध्य भागात होत आहेत. आफ्रिका आणि वेस्टर्न पॅसिफिकमध्ये परिस्थिती बरीच चांगली आहे.
डब्ल्यूएचओनेही कोरोना विषाणू चाचणीचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे सांगितली आहे. यासह असेही म्हटले आहे की, रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे अत्यंत महत्वाचे आहे, तरच या धोकादायक विषाणूपासून लोक वाचू शकतील. या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते, मात्र त्यामध्ये शिथिलता आणल्यानंतर काही देशांमध्ये साथीच्या रोगाची दुसरी लाट दिसून आली आहे, तर काही देशांमध्ये या आजाराची संख्या पूर्वीपेक्षा आणखी वाढली आहे. दहा देशांत 70 टक्के संस्क्रमित प्रकरणे आणि मृत्यूची नोंद झाली आहे आणि यातील अर्धे फक्त 3 देशांमध्ये आहेत. (हेही वाचा: COVID-19 च्या हवेतून संसर्ग होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर CDC कडून नियमावलीमध्ये बदल)
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, या विषाणूमुळे आतापर्यंत 10 लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक संसर्ग झाला आहे.