Private Detective |(Photo credit: archived, edited, representative image)

Companies Are Hiring Private Detectives: अनेक कर्मचारी फिरायला जाण्यासाठी, आराम करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी खोटे बोलून कंपनीमधून रजा घेतात. अशावेळी सर्वसामान्यपणे आजारी असणे हे खोटे कारण दिले जाते. मात्र असे करणे कर्मचाऱ्यांना महागात पडू शकते. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अशा खोट्या कारणांची तपासणी करण्यासाठी हेर (Detectives) नेमत आहेत. कंपन्यांनी नेमलेले हे खासगी गुप्तहेर कर्मचारी खरोखरच आजारी आहेत की खोटे बोलून रजा घेतली आहे, हे शोधून काढतील. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागे खाजगी गुप्तहेर पाठवण्याचा हा ट्रेंड जर्मनीमध्ये सर्वाधिक दिसून येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हेरांनी अनेक कर्मचाऱ्यांचे खोटे पकडले आहे.

कर्मचाऱ्याला खरोखर रजेची गरज आहे की नाही हे कळावे, हा हेर नेमून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा कंपन्यांचा उद्देश आहे. प्रत्यक्षात विनाकारण घेतल्या जाणाऱ्या या रजांमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे हे पाउल उचलले जात आहे. आपल्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी कंपन्यांकडून मागणी वाढल्याचे, खासगी गुप्तहेर संस्थांचे म्हणणे आहे.

अशा अनेक एजन्सी आहेत ज्यांनी वर्षभरात अशा 1 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये आपली सेवा दिली आहे आणि कर्मचारी खोटे बोलून रजेवर गेल्याचे त्यांच्या गुप्तहेरांनी शोधून काढले आहे. जर्मनीच्या सांख्यिकी एजन्सी डेस्टाटिसच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने सरासरी 11.1 दिवसांची आजारी रजा घेतली होती, जी 2023 मध्ये वाढून 15.1 दिवस झाली. 2023 मध्ये या सुट्ट्यांमुळे, देशाचा जीडीपी 0.8% ने घसरला, ज्यामुळे त्याला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला. (हेही वाचा: Pune Drugs Case: अंमली पदार्थांचा विळखा; Private Detective द्वारे मुलांवर नजर, पुणे येथील पालकांचा प्रताप)

एवढेच नाही तर कंपन्यांच्या कामगिरीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. या खासगी गुप्तहेरांच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले असून, दीर्घ रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, ते सुटीच्या काळात पबमध्ये स्टेज परफॉर्मन्स देत असल्याचे आढळून आले. हे प्रकरण इटलीचे असून आत ते न्यायालयात पोहोचले आहे. जर्मनीमध्ये आजारपणामुळे रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना 6 आठवड्यांचा पूर्ण पगार मिळतो. त्यानंतर विमा कंपन्या त्यांचा खर्च उचलतात. मात्र यामुळे कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.