Lockdown काळात सुरु झालेल्या Work From Home मुळे कंपन्या खुश; 74 टक्के सीएफओंना लॉकडाऊन नंतरही सुरु ठेवायची आहे हीच व्यवस्था- सर्वेक्षणातून खुलासा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

सध्याचे जगभरातील कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट पाहता बहुतेक सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची (Work From Home) मुभा दिली आहे. यामुळे कंपन्यांचे कामकाज अपेक्षेपेक्षा अधिक बदलत आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन या दिग्गज कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. गार्टनर (Gartner) या आंतरराष्ट्रीय संस्थेने याच विषयावर सर्वेक्षण केले. यामध्ये 74 टक्के सीएफओचा विश्वास आहे की, घरून काम करण्याच्या या सुविधेमुळे अपेक्षेपेक्षा उत्तम रिझल्ट मिळत आहे. म्हणूनच काही कंपन्यांना ही व्यवस्था कायमस्वरुपी लागू करायची आहे, जेणेकरून ते कार्यालयीन खर्च कमी करू शकतील.

इतकेच नव्हे तर 81 टक्के सीएफओंनी असेही म्हटले आहे की, भविष्यात ते खास घरून कामासाठी कर्मचार्‍यांची भरती करतील. यासाठी त्यांनी नियुक्तीच्या अटींमध्ये काही बदल करण्याचा विचारही केला आहे. घरातून कामाबद्दल 20% सीएफओचा असा विश्वास आहे की, घरातून काम केल्याने त्यांच्या बिल्डींग कॉस्टमध्ये  आणि प्रवासाच्या खर्चामध्ये वरीच बचत होईल. मात्र 71% सीएफओ असे देखील म्हणतात की, यामुळे व्यवसायातील सातत्यता आणि उत्पादकता यावर परिणाम होऊ शकतो.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 317 सीएफओपैकी बहुतेकांनी व्हर्च्युअल ऑफिसच्या दिशेने ही परिस्थिती प्रभावी असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्या लॉकडाउन संपल्यानंतरही कायमस्वरुपी घरून काम करण्याची मुभा देण्याचा विचार करीत आहेत. Apple, मायक्रोसॉफ्ट, गूगल, Amazon यांसारख्या मोठ्या कंपन्या जगभरातील आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी देत आहेत. ट्विटर आणि गुगलने जगभरातील त्यांच्या केंद्रांमध्ये पुढील ऑर्डरपर्यंत हीच व्यवस्था लागू असेल असे सांगितले आहे. (हेही वाचा: Coronavirus पासून वाचण्यासाठी Work From Home करताय तर 'या' गोष्टींची घ्या काळजी अन्यथा होऊ शकते नुकसान)

गार्टनरच्या या सर्वेक्षणात 200 हून अधिक अशा सीएफओंशी चर्चा झाली, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 500 दशलक्ष ते 50 अब्ज डॉलर्स आहे आणि ज्यांच्या कंपन्यांमध्ये एक लाख कर्मचारी आहेत.