Cities to be Submerged: पुढील 9 वर्षात जगातील 9 मोठी शहरे बुडण्याच्या धोका; भारतामधील 'या' शहराचा समावेश
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: IANS/File Photo)

ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) ही सध्या जगाला भेडसावणारी फार मोठी समस्या आहे. तापमान वाढत आहे, हिमनद्या वितळत आहेत आणि त्यामुळे जगातील अनेक शहरे 2050 आणि 2100 पर्यंत पाण्याखाली जातील, अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र जगातील अशी 9 शहरे आहेत ज्यांना पुढील 9 वर्षांत सर्वाधिक धोका आहे. ही शहरे समुद्र पातळी आणि पुरामुळे पाण्याखाली जाऊ शकतात. भारतातील कोलकाता शहराचाही या यादीत समावेश आहे. क्लायमेट सेंट्रल (Climate Central) नावाच्या प्रकल्पाने ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या धोक्यांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात 9 शहरे बुडणार असण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. या 9 शहरांमध्ये पुढील शहरांचा समावेश होतो.

यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स शहर. समुद्राची पातळी झपाट्याने वाढल्यास या शहरासाठी धोका निर्माण होऊन हे शहर पाण्याखाली जाईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम, रॉटरडॅम आणि हॉग ही शहरे कमी उंचीवर आहेत आणि उत्तर समुद्राच्या अगदी जवळ आहेत. पण समुद्राची पातळी ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता ही शहरेही पाण्याखाली जातील, असे या अहवालात म्हटले आहे. एवढेच नाही तर कोणतेही धरण, अडथळे, पूरप्रवाह या शहरांना वाचवू शकणार नाहीत असेही म्हटले आहे.

बसरा हे इराकमधील शत अल अरब नावाच्या मोठ्या नदीच्या काठी वसले आहे. ही नदी पारसच्या आखाताला मिळते. या शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दलदलीचा परिसर आहे. समुद्राची पातळी वाढल्यास या शहराला धोका आहे. पूर आला तर या शहराचे मोठे नुकसान होऊ शकते.

इटलीतील व्हेनिस शहर पाण्याच्या मध्यभागी वसले आहे. दरवर्षी येथे पूर येतो. या शहराजवळील समुद्राची पातळी वाढत आहे तसेच हे शहर दरवर्षी 2 मिलिमीटर खाली बुडत आहे. समुद्राची पातळी झपाट्याने वाढली तर 2030 पर्यंत हे शहर पाण्याखाली जाईल.

व्हिएतनामच्या पूर्व भागात वसलेल्या हो ची मिन्ह शहराची उंची समुद्रसपाटीपेक्षा जास्त नाही. या शहराला सर्वात मोठा धोका मेकाँग डेल्टापासून आहे. या डेल्टाच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. 2030 पर्यंत हो ची मिन्ह सिटी पाण्याखाली जाईल अशी भीती शास्त्रज्ञांना आहे.

क्लायमेट सेंट्रलच्या मते, भारतातील कोलकाता शहरातील समुद्र पातळी वाढण्याचा धोकाही खूप जास्त आहे. पावसाळ्यात येथे पूर येतो. याशिवाय पावसाचे पाणी जमिनीत जात नाही. त्याच्या जवळ असलेला मोठा डेल्टा असलेला भाग त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

अमेरिकेतील जॉर्जिया येथे असलेले सवाना शहर हे चक्रीवादळाचे मुख्य ठिकाण आहे. येथे दरवर्षी अनेक चक्रीवादळे येतात. दरवर्षी नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या या भागाला चारही बाजूंनी समुद्राने वेढले आहे. शहराच्या आत उत्तरेला सवाना नदी आणि दक्षिणेला ओगीची नदी आहे. त्यामुळे आजूबाजूला भरपूर पाणथळ जागा आहे. हे शहर पूर्णपणे पाण्यात बुडायला 2050 लागेल, पण 2030 पर्यंत याठिकाणी अनेक संकटे येतील. (हेही वाचा: Water Risks: भारतामधील 30 शहरांमध्ये निर्माण होईल मोठे पाण्याचे संकट; महाराष्ट्रातील 'या' 5 शहरांचा समावेश- WWF Survey)

गयानाची राजधानी जॉर्जटाउनने समुद्राच्या पुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याच्याभोवती भिंती बांधल्या आहेत. या शहराच्या एका बाजूला सुमारे 400 किमी लांबीचे समुद्र क्षेत्र आहे. जिथे खूप जोरदार लाटा उठतात. त्याच्या काठांची उंची 0.5 मीटर ते एक मीटर पर्यंत जाते. समुद्राचे पाणी भिंती ओलांडून शहरात प्रवेश करते. गयानाची 90% लोकसंख्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ राहते.