देशातील 30 शहरांमध्ये पाण्याचे मोठे संकट (Water Risks) निर्माण होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार येत्या 20 वर्षात या शहरांमधील पाण्याचे संकट अजूनच वाढणार आहे. या शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबईचा (Mumbai) समावेश आहे. वर्ल्ड वाइड फंड (WWF) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात ही माहिती दिली. या अहवालात असे म्हटले आहे की 2050 पर्यंत जगातील 100 शहरांमध्ये पाण्याचे संकट अधिक गहिरे होत जाईल. यात भारतातील 30 आणि चीनमधील 50 शहरे आहेत.
दिल्ली, जयपूर, इंदूर, अमृतसर, पुणे, श्रीनगर, कोलकाता, बेंगळुरू, मुंबई, कोझिकोड आणि विशाखापट्टणम यासह भारतातील 30 शहरांमध्ये पाण्याच्या संकटाचा धोका सतत वाढत असल्याचे या अहवालांमध्ये म्हटले आहे. ही शहरे 'हाय वॉटर रिस्क' श्रेणीमध्ये आहेत. जागतिक स्तरावर जास्तीत जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे संकट सध्या 17 टक्के आहे. येत्या 20 वर्षात म्हणजेच 2020 च्या तुलनेत 2050 पर्यंत ते 17 वरून 51 टक्क्यांपर्यंत वाढेल.
जगातील सुमारे 35 कोटी लोकांना या जलसंकटाचा फटका बसणार असून त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल. अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल असेही अहवालामध्ये नमूद केले आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे संचालक सेजल वराह म्हणतात, भारतातील शहरे खूप वेगाने वाढत आहेत. आगामी काळात फक्त शहरे ही भारताची पर्यावरणाची स्थिती निश्चित करतील. सतत नागरीकरणाच्या दरम्यान पर्यावरणाची किती काळजी घेतली जाईल यावरूनच शहरांचे भविष्य निश्चित होईल. महत्वाचे म्हणजे या 30 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व नाशिक ही ती शहरे होय.
या अहवालामध्ये गोड्या पाण्याचे संवर्धन करण्याबाबत स्मार्ट सिटी तयार करण्याचे कौतुक झाले आहे. विश्लेषणामध्ये असे म्हटले आहे की, पाण्याचे व्यवस्थापन आणि एकूणच संरचनेचा विकास यात सामील आहे, जे पाण्याचे संतुलन राखण्यात मदत करू शकते.