ChatGPT Medical Diagnosis: कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial intelligence) हा मानवी बुद्धीमत्तेचाच एक अविष्कार. पण हा पुढे मानवाच्या विचार करण्यावर किंवा एकूण भावविष्वावरच प्रभुत्व गाजवतो की काय? असा सवाल एका बाजूला उपस्थित होत असतानाच दुसऱ्या बाजूला दैनंदिन जगण्यातील अनेक गोष्टींवरही तो वचक ठेवणार का? हा खरा चिंतेचा विषय आहे. आता तर तो वैद्यकीय क्षेत्रातही दाखल झाला असून थेट डॉक्टरांशी स्पर्धा करतो की काय, इथपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपले आहे. एका महिलेने दावा केला आहे की, तिच्या चार वर्षाच्या मुलाला झालेल्या आजाराचे निदान करण्यासाठी चक्क चॅट जीपीटी (ChatGPT) कामी आले आहे. धक्कादायक म्हणजे तीने म्हटले आहे की, मुलाच्या आजाराचे निदान करण्यासाठी तिने तब्बल 17 डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. पण कोणाकडेच समाधानकारक आणि अचूक निदान, उत्तर मिळाले नाही. अखेर तिने एआय (AI) ची मदत घेतली आणि तिला उत्तर मिळाले.
चार वर्षांचा एलेक्स आणि त्याची आई कोर्टनी, हे पाठीमागील त्याच्या दाताच्या विशीष्ट दुखण्याने हैराण होते. त्याच्या दातात विशीष्ट प्रकारच्या वेदना होत असत. त्यावर उपाचारासाठी पाठिमागील तीन वर्षे ते काम करत होते. विविध डॉक्टरांना भेटत होते. कोर्टनी याबद्दल बोलताना सांगिते की, मुलाच्या आजारामुळे ती प्रचंड अस्वस्थ होती. त्याला वेदनेपासून मुक्ती मिळविण्यासाठी दररोज वेदनाशामक औषधांचे सेवन करावे लागत असे. त्याने ती घेतली तरच तो आरामदाही परिस्थीती अनुभवत असे. अन्यथा त्याचे आयुष्य क्षणात वेदनांनी भरुन जात असे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
महिला पुढे सांगते की, खास करुन कोविड-19 महामारी काळात तिच्या मुलाला प्रचंड त्रासातून जावे लागले. विशेषत: एलेक्स जेव्हा काही खात असे तेव्हा घास चावताना त्याला प्रचंड वेदना होत. ते पाहून तिला प्रचंड त्रास होत असे. त्यामुळे त्याच्यावरील वैद्यकीय उपचारांसाठी तिने अनेक डॉक्टरांची भेट घेतली. जवळपास 17 च्या आसपास. पण काहीही फरक पडला नाही. त्याच्या आजाराचे कोणतेही निदान झाले नाही.
महिलेने म्हटले आहे की, मुलाच्या दाताच्या दुखण्याने त्रासलेल्या तिला एक दिवस अचानक चॅटजीपीटीबद्ल माहिती मिळाली. तिने मुलाच्या दाताच्या दुखण्याची लक्षणे चॅटजीपीटी टूलवर टाकली आणि उत्तर मागितले. पुढच्या काहीच क्षणात तिला अनेक पर्यायांसह उत्तर आले. ज्यामुळे तिला मुलाच्या त्रासाचे कारण समजले, असा दावा तिने केला आहे. ती सांगते की, तिने मुलाला टेथर्ड कॉर्ड सिंड्रोमचा त्रास असल्याचे सांगितले. मजेशीर बाब अशी की, कोर्टनीने ताबडतोब न्यूरोसर्जनची भेट घेतली आणि टिथर्ड कॉर्ड सिंड्रोमची शंका व्यक्त केली. न्यूरोसर्जनने एमआरआयचे पुनरावलोकन केले आणि अॅलेक्सच्या निदानाची पुष्टी केली, ज्यामुळे त्यांच्या वैद्यकीय प्रवासात एक टर्निंग पॉईंट होता.