अर्थव्यवस्था | प्रतीकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरातील करोडो लोकांना बेरोजगार केले, त्यांना आर्थिक संकटाच्या गर्तेते ढकलले. या काळात मोठ-मोठ्या कंपन्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले, परंतु दुसरीकडे या व्हायरसने अनेकांचे नशीब बदलले. ऑक्सफॅम (Oxfam) अहवाल 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' (Profiting From Pain) मध्ये म्हटले आहे की, कोविड-19 साथीच्या रोगाने दर 30 तासांमध्ये एक नवीन अब्जाधीश निर्माण केला आहे आणि आता त्याच वेगाने 10 लाख लोक अत्यंत गरिबीत जातील. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोक येथे दाखल झाले आहेत.

या प्रसंगी ऑक्सफॅम इंटरनॅशनलने सोमवारी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात जगात दर 30 तासांमध्ये एक नवीन अब्जाधीश उदयास आला. उलट या वर्षी आता दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत ढकलले जातील. अहवालात म्हटले आहे की, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मागील दशकांच्या तुलनेत झपाट्याने वाढल्या आहेत. यामुळेच अन्न आणि ऊर्जा क्षेत्रातील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये दोन दिवसांनी 1 अब्ज डॉलरने वाढ होत आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही सार्वजनिक-खाजगी भागीदारीची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. दावोसमध्ये दोन वर्षांनंतर त्याची बैठक होत आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे ही बैठक होऊ शकली नाही. ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी अहवालात म्हटले आहे की, 'जगातील अब्जाधीश त्यांच्या नशिबात झालेल्या अविश्वसनीय परिवर्तनाचा उत्सव साजरा करण्यासाठी दावोस येथे येत आहेत.' एक तर महामारी आणि त्यात आता अन्न आणि ऊर्जेच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. दुसरीकडे, लाखो लोक केवळ जगण्यासाठी अभूतपूर्व महागाईचा सामना करत आहेत. (हेही वाचा: Global Food Crisis: जगभरात अन्नधान्य किमतींमध्ये वाढ, विविध देशांकडून निर्यातीवर निर्बंध)

अहवालात म्हटले आहे की, कोविड-19 च्या पहिल्या दोन वर्षांत अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या 23 वर्षांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जगातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती आता जागतिक जीडीपीच्या 13.9 टक्के इतकी आहे. 2000 मध्ये ते 4.4 टक्के होते, जी तीन पटीने वाढली आहे. दरम्यान, यावर्षी 263 दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत जातील असा अंदाज ऑक्सफॅमने वर्तवला आहे. दर 33 तासांनी 10 लाख लोक गरीब होतील. तुलनेने, महामारीच्या काळात 573 लोक अब्जाधीश झाले किंवा दर 30 तासांनी एक व्यक्ती अब्जाधीश झाला.