Better.com CEO Vishal Garg (Photo Credits: Twitter)

विशाल गर्ग (Vishal Garg) हे भारतीय-अमेरिकन व्यावसायिक आहेत. न्यूयॉर्कमध्ये, ते Better.com नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म चालवतात, जे लोकांना कमीतकमी मानवी हस्तक्षेप आणि कागदपत्रांसह डिजिटलायझेशन प्रक्रियेद्वारे कर्ज देते. या कंपनीचे कर्मचारी भारत अमेरिकेसह जगभरात आहेत. मात्र, विशाल जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू बनले होते, जेव्हा डिसेंबर 2021 मध्ये, त्यांनी झूम-मीटिंगमध्ये त्यांच्या सुमारे 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. यानंतर आता ते पुन्हा याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. विशाल गर्ग लवकरच कंपनीतील आणखी 3,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याच्या बातम्या आहेत.

बातमीनुसार, विशाल त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी करणार आहे. बुधवार, 9 मार्च रोजीच ही छाटणी होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. ही प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये कधीतरी होणार होती, पण याची योजना बनताच त्याची तारीख मीडियात लीक झाली. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तारीख पुढे ढकलावी लागली. सुमारे एक महिन्याच्या सुट्टीनंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा कंपनीचे नेतृत्व हाती घेतलेल्या विशाल यांनी तेव्हापासून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची रूपरेषा बनवायला सुरुवात केली.

याअंतर्गत डिसेंबरमध्ये त्यांनी झूम-बैठकीदरम्यान पहिल्या 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि आता आणखी 3 हजार कर्मचाऱ्यांना ते काढून टाकणार आहेत. डिसेंबरच्या बैठकीत त्यांनी सांगितले होते की कंपनीला Aurora Acquisition Corp and Soft bank कडून सुमारे $ 750 दशलक्ष (सुमारे 5,768 कोटी) ची भांडवली गुंतवणूक प्राप्त झाली आहे. असे असतानाही ते कंपनीतून लोकांना काढून टाकत आहेत. (हेही वाचा: Russia-Ukraine War: रशियाला नवा आर्थिक झटका, Visa-Master Card यांनी बंदी केल्या सेवा)

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना काढून टाकल्याने विशाल यांच्या कंपनीच्या कामावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो कारण त्यांचे बहुतेक कर्मचारी विक्री आणि ऑपरेशन्समधील आहेत. दरम्यान, Better.com ची स्थापना 2016 मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. Better.com ची गुंतवणूक सॉफ्ट बँक ऑफ जपानने केली आहे. त्याचे मूल्यांकन 7 अब्ज डॉलर इतके आहे.