Lebanon Blast (Photo Credits: ANI)

लेबनॉनची (Lebanon) राजधानी बेरूत (Beirut) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड स्फोटानंतर आता मृतांचा आकडा 157 वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या 5,000 च्या वर पोहोचली आहे.  लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत, त्यामुळे दुर्घटनाग्रस्त लोकांच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी नुकसानीबाबत लेबनॉनकडून मूल्यांकन मागितले आहे, त्या आधारे त्यांना कोणत्या प्रकारचे सहाय्य करता येईल याची प्रक्रिया ठरवली जाईल.

लेबनॉनची राजधानी बेरूत येथे मंगळवारी संध्याकाळी किनाऱ्याजवळ उभे असलेल्या जहाजात भीषण स्फोट झाला. हे जहाज फटक्यांनी भरलेले होते व त्यामुळे झालेला स्फोट इतका भीषण होता की जणू काही बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले. हा स्फोट इतका भयानक होता की 10 किमीच्या परिघामधील घरांचे नुकसान झाले. बेरूतचे राज्यपाल मरवान अबूद यांनी बुधवारी सौदी अरेबियाद्वारे संचालित टीव्ही स्टेशन अल-हदसला सांगितले की या स्फोटामुळे सुमारे 10 ते 15 अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले आहे. ते म्हणाले की सुमारे तीन लाख लोक बेघर झाले आहेत. अशात आता अनेक देश या संकटाच्या वेळी लेबनॉनला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

एएनआय ट्वीट -

याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की भारताने या नुकसानीबाबत  मूल्यांकन मागितले आहे, त्या आधारे भारत लेबनॉनला मदत करेल. त्याचबरोबर माहिती मिळत आहे की, या स्फोटात कोणत्याही भारतीयाचे नुकसान झाले नाही.  केवळ 5 जणांना किरकोळ जखम झाली आहे. बेरूतमध्ये झालेल्या स्फोटानंतर लगेचच भारतीय दूतावासाने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या स्फोटामुळे लेबनॉन हादरले आहे. आता त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची अपेक्षा आहे. (हेही वाचा: लेबनानची राजधानी बेरूतमध्ये झालेल्या स्फोटांत 10 जणांचा मृत्यू; पहा व्हिडिओ)

राजकीय माध्यमांनुसार, चीन बेरूतमधील पीडित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी, लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलातील (UNIFL) आरोग्यसेवा व्यावसायिकांची एक टीम पाठवणार आहे. युनायटेड किंगडम बचाव कार्यात मदत करण्यासाठी रॉयल नेव्ही जहाज पाठवित आहे. स्वित्झर्लंडनेही बेरूतमध्ये झालेल्या स्फोटानंतर मदत करण्यासाठी अभियंता आणि रसद तज्ञांसह तज्ञांची एक टीम लेबनॉनला पाठविली आहे. स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, लेबनॉनच्या सार्वजनिक इमारती जसे की शाळा व रुग्णालये यांच्या स्थितीची तपासणी करण्यासाठीही तज्ज्ञ उपलब्ध असतील.