AstraZeneca Withdraws Covid Vaccine: ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेकाने (Oxford-AstraZeneca) यूके हायकोर्टात दिलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये प्रथमच कबूल केले होते की, त्यांच्या कोविड लसीचे काही दुर्मिळ दुष्परिणाम समोर येऊ शकतात. त्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. अनेक देशांमध्ये ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस कोविशील्ड आणि व्हॅक्सझेव्हेरिया (Covishield and Vaxzeveria) या ब्रँड नावाने विकली गेली आहे. या लसीबाबत अनेक तक्रारी समोर आल्यानंतर आता ॲस्ट्राझेनेकाची कोरोना लस जागतिक स्तरावर मागे घेतली जात आहे. लवकरच ही लस बाजारातून काढली जाईल.
मात्र यामागे काही व्यावसायिक कारणे असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मंगळवारी (7 मे) कंपनीने सांगितले की, ही लस यापुढे तयार किंवा पुरवठा केली जात नाही. फार्मा कंपनीने हा निर्णय निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते लस मागे घेण्याचा त्याचे दुष्परिणाम TTS - थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमशी संबंध नाही.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने विकसित केलेली ही लस गंभीर दुष्परिणाम आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप अनेक कुटुंबांनी न्यायालयात तक्रारींद्वारे केला आहे. आता कंपनीद्वारे लस माघारीचा अर्ज 5 मार्च रोजी सादर करण्यात आला आणि तो मंगळवारी लागू झाला. यासह यापूर्वी ज्या देशांनी व्हॅक्सझेव्हरिया नावाच्या लसीला मान्यता दिली होती, त्या देशांमध्येही लस मागे घेण्यासाठी अर्ज सादर केले जातील. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड नावाने ही लस तयार करून विकली होती.
सध्या ॲस्ट्राझेनेकाला यूकेमध्ये 100 दशलक्ष पौंडच्या खटल्याचा सामना करावा लागत आहे, कारण कंपनीने कबूल केले की त्यांच्या लसीमुळे अनेक मृत्यू आणि इतर अनेक आजार झाले आहेत. या कारवाईच्या खटल्याशी संबंधित प्रकरणात, कंपनीने हेही मान्य केले की, त्यांच्या लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. या आजारामुळे मानवांमध्ये रक्त गोठणे आणि प्लेटलेटची संख्या कमी होणे, असे दुष्परिणाम दिसू शकतात. ब्रिटनमध्ये यामुळे सुमारे 81 मृत्यू झाले आहेत.