जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेचे (US) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरूद्ध इराणने (Iran) अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. इराणने इंटरपोलकडे (Interpol) अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह डझनभर इतर लोकांना अटक करण्यासाठी मदत मागितली आहे. वृत्तसंस्था एपीने सोमवारी दिलेल्या वृत्तनुसार, स्थानिक वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्याविरूद्ध हे अटक वॉरंट बगदादमधील ड्रोन हल्ल्यासाठी (Drone Strike) काढण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये इराणचा सर्वोच्च जनरल कासिम सुलेमानी (Qassem Soleimani) ठार झाला होता. तेहरानचे वकील अली अलकासीमहर यांनी सोमवारी सांगितले की, ट्रम्प यांच्यावर 3 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात 30 हून अधिक लोकांसह सहभाग झाल्याचा आरोप आहे.
अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जानेवारीत बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, अमेरिकेने लष्करी कारवाई केली होती. या हल्ल्यामध्ये इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) चे वरिष्ठ जनरल आणि कुड्स फोर्स कमांडर कासीम सुलेमानी ठार झाले होते. आता जरी इराणने इंटरपोलची मदत मागितली असली, तरी फ्रांसमधील ल्योन येथील इंटरपोलने अजूनतरी यावर प्रतिक्रिया दिली नाही. याक्षणी इंटरपोलने इराणची विनंती स्वीकारण्याची शक्यता नाही. या वॉरंटसह इराणकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अटक होण्याचा कोणताही धोका नाही, परंतु यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: कराची येथील Pakistan Stock Exchange बिल्डिंग वर दहशतवादी हल्ला; दोन नागरिकांचा मृत्यू)
अमेरिकेने तेहरानच्या जागतिक सामर्थ्यवान देशांशी झालेल्या सर्व आण्विक करारातून स्वत: ला वेगळे करून त्यावर बंदी घातली होती, त्यानंतरच दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प आणि इतरांकरिता इराणने इंटरपोलकडे ‘रेड कार्नर नोटिस’ची मागणी केली होती. इंटरोपाल अत्यंत गंभीर प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना रेड कॉर्नर नोटिस जारी करते. त्यानंतर स्थानिक अधिकारी इंटरपोलला त्यांच्या देशाच्या वतीने इच्छित व्यक्तीला अटक करण्यासाठी विनंती करतात. ही नोटीस संबंधित देशाला इच्छित व्यक्तीस अटक करण्यास किंवा प्रत्यार्पणासाठी सक्ती करू शकत नाही. मात्र, या सूचनेच्या आधारे, सरकार त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून, त्याच्या प्रवासावर बंदी घालू शकते.