Zulfiqar Khan (संग्रहित संपादित प्रतिमा)

चित्रपट निर्माती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सचे (Balaji Telefilms) माजी सीओओ झुल्फिकार अहमद खान (Zulfiqar Khan) यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. जुल्फिकार खान गेल्या अनेक दिवसांपासून नैरोबीमधून बेपत्ता असल्याचा खुलासा एकता कपूरने केला होता. एकता कपूरने परराष्ट्र मंत्रालय आणि केनिया रेडक्रॉसकडेही या प्रकरणी मदत मागितली होती. आता माहिती मिळत आहे की, झुल्फिकार अहमद खान आणि त्यांचा मित्र मोहम्मद झैद सामी किडवाई यांचा मृत्यू झाला आहे.

अहवालानुसार, झुल्फिकार अहमद खान आणि मित्र मोहम्मद झैद सामी किडवाई  यांची केनियातील गुन्हे अन्वेषण संचालनालयाच्या (DCI) विशेष सेवा युनिटने (SSU) हत्या केली आहे. केनियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येथील राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांच्या निकटवर्तीयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. हे दोघेही यावर्षी जुलै महिन्यात केनियात बेपत्ता झाले होते. झुल्फिकार हे बालाजी टेलिफिल्म्स आणि स्टार टीव्हीचे माजी सीओओ होते.

झुल्फिकार हे केनियामधील क्वान्झा डिजिटल मोहीम संघाचा भाग होते. जुलैमध्ये, नैरोबीमधील लोकप्रिय क्लबमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघे बेपत्ता झाले होते. हे दोघे केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांच्या निवडणूक प्रचाराच्या माहिती आणि संपर्क पथकात सहभागी होण्यासाठी गेले होते. अनेक दिवसांपासून या दोघांची काहीही माहिती न मिळाल्याने यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे मदतीची मागणी केली होती आणि आपल्या स्तरावरूनही अनेक प्रयत्न केले होते.

एकता कपूर हिने झुल्फिकारबद्दलची पोस्ट शेअर करून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, हे दोघे एका कॅबमध्ये होते, ज्याला डीसीआय युनिटने ब्लॉक केले होते. हे दोघे क्लबमधून बाहेर पडल्यावर त्यांचे अपहरण करण्यात आले व खान, किडवाई आणि त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर या सर्वांना दुसऱ्या कारमध्ये नेऊन मारण्यात आले. (हेही वाचा: Nubia Cristina Braga: ब्राझिलियन इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर नुबिया क्रिस्टिना ब्रागा हिची गोळ्या झाडून हत्या, वयाच्या 23 व्या वर्षी मृत्यू)

अपहरण झाल्यानंतर तीन दिवसांनी तिघांनाही वाहनात बसवून राजधानी नैरोबीपासून 150 किमी अंतरावर असलेल्या अबरदारेस येथे पाठवले. एसएसयु हे केनियाच्या डीसीआय अंतर्गत काम करते. गुन्ह्यांची माहिती गोळा करणे हे त्यांचे त्याचे काम आहे. मात्र एसएसयु हे केनियाचे किलर पोलीस युनिट म्हणूनही ओळखले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय लोक बेपत्ता झाल्याच्या संदर्भात स्पेशल सर्व्हिस युनिटचे नाव समोर आल्यानंतर अध्यक्ष रुटो यांनी गेल्या शनिवारी एसएसयु बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.