Peoples Liberation Army | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारतासोबत झालेल्या डोकलाम संघर्षानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग (Xi Jinping) यांनी चीनी लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीला (People's Liberation Army) तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारतासह चीनच्या शेजारी राष्ट्रांच्या भूवया उंचावल्या आहेत. जिनपींग यांचे हे वक्तव्य तैवान-चीन वादाच्या पार्श्वभूमिवर आल्याची चर्चा आहे. दरम्यान, चीन आणि तौवान (China-Taiwan Dispute)यांच्यात निर्माण झालेल्या वादात अमेरिका मध्यस्थी करताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारे दबाव न टाकता चीनने तैवान सरकारसोबत शांततापूर्ण मार्गाने संवाद सुरु करावा, असा आग्रह अमेरिकेने केला आहे. तैवानमधील अमेरिका दूतावास प्रवक्ता अमांडा मनसोर (Amanda Mansour) यांनी ही प्रतिक्रीया नुकतीच दिली. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी चीनी लष्कराने देशांच्या सीमांबाबत सतर्क असायला हवे असे प्रतिक्रियात्मक अप्रत्यक्ष आदेश दिल्यानंतर अमांडा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अमांडा मनसोर यांनी म्हटले आहे की, अमेरिका चीन आणि तैवान यांच्यात शांततापूर्ण संबंध निर्माण झालेले पाहू इच्छितो. चीन आणि तैवान या दोन्ही देशांनी एकमेकांमधील वाद आणि निर्माण झालेली दरी संवादाने कमी करायला हवी. त्यासाठी शांततापूर्ण मार्गाची आवश्यकता आहे. तैवान येथील अमेरिकन इन्स्टिट्यूट तायपे येथे अमेरिकी दूतावास आहे. 1979 पासून हे दूतावास वॉशिंगटनच्या लाभासाठी प्रयत्न करत आले आहे. 1979 मध्ये अमेरिकेने चीनसोबत कुटनीती संबंध निर्माण करण्यासाठी तायपेसोबतचे संबंध तोडले होते.

दरम्यान, केंद्रीय सैन्य आयोगाच्या (सीएमसी) एका बैठकीला संबोधीत करताना शी जिनपींग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चीनी लष्कराला धोका, संकट आणि युद्ध अशा सर्व आघाड्यांवर सतर्क राहण्याची गरज असल्याचे म्हटले होते. सीएमसी हे चीनी लष्कराची सर्व्हेसर्वा आहे. सीएमसीचे अध्यक्षपद हे जिनपींग यांच्याकडेच आहे. त्यामुळे जिनपींग यांच्या या वक्तव्याकडे 2019 साठी चीनी सैन्याला दिलेला आदेश म्हणूनच पाहिले जात आहे. (हेही वाचा, चीन - भारत युद्ध? तिबेट सीमेवर मोठी तयारी)

भारतासोबत सुरु असलेल्या सीमावादासोबतच चीनचे इतर ही शेजारी राष्ट्रांसोबत वाद सुरु आहेत. येनकेन प्रकारेन आपला भूविस्तार करायाचा हा चीनचा राष्ट्रीय अजेंडा आहे. चीन त्यासाठी अनेकदा युद्धाची भाषा करतो. काही देशांसोबत चीनचे युद्धही झाले आहे. हे युद्धही भूभाग बळकवण्याच्या एकमेव उद्देशाने झाले आहे.