Afghanistan: तालिबानच्या राजवटीमध्ये लोकप्रिय टीव्ही अँकरवर आली स्ट्रीट फूड विकण्याची वेळ (See Photos)
Musa Mohammadi (Photo Credit : Twitter)

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्यानंतर देशाला अनेक आर्थिक आणि राजकीय पेचप्रसंगाचा सामना करावा लागला आहे. देशात एवढा बदल झाला आहे की मोठ-मोठे व्यावसायिक रस्त्यावर आले आहेत. स्त्रियांवर निर्बंध लादण्यात आले आहेत, देशात इतरही अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे. नुकतेच असे एक छायाचित्र समोर आले आहे, जे अफगाणिस्तानचे दुःखद वास्तव चित्रण करते. हमीद करझाई सरकारसोबत काम केलेल्या कबीर हुकमल यांनी एक ट्विटर पोस्ट केली आहे, ज्यावरून देशातील प्रतिभावान व्यक्तींना गरिबीच्या दरीत ढकलण्यात आल्याचे दिसते.

हकमलने मुसा मोहम्मदी (Musa Mohammadi) या अफगाण पत्रकाराचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये हकमलने लिहिले आहे की, मोहम्मदी अनेक वर्षांपासून मीडिया इंडस्ट्रीचा भाग होता, मात्र सध्या अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अशी आहे की त्याला आता आपल्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर अन्न विकावे लागत आहे. मुसा मोहम्मदीने अनेक टीव्ही चॅनेलमध्ये अँकर आणि रिपोर्टर म्हणून काम केले आहे. परंतु आता तालिबानच्या राजवटीमध्ये त्याच्याकडे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी कोणतेही उत्पन्न नाही. पैसे कमवण्यासाठी सध्या तो स्ट्रीट फूड विकत आहे.

जेव्हा टीव्ही अँकर मुसा मोहम्मदीची कथा आणि चित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा 'नॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन'चे संचालक अहमदउल्ला वासिक यांच्याही नजरेस ती पडली. त्यानंतर त्यांनी ट्विटरद्वारे मुसाला नोकरी देऊ केली. त्यांनी लिहिले की, ‘खासगी टीव्ही स्टेशनचे प्रवक्ते मुसा मोहम्मदी यांच्या बेरोजगारीचे फोटो सोशल मीडियावर पसरत आहेत. 'नॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन'चा संचालक म्हणून मी त्यांना आश्वासन देतो की आम्ही त्यांना नोकरी देऊ. आम्हाला सर्व अफगाण व्यावसायिकांची गरज आहे.’ (हेही वाचा: इराणने व्यभिचाराबाबत सुनावली अतिशय निर्दयी शिक्षा; 51 लोकांना दगडाने ठेचून मारले- Report)

तालिबानने गेल्या काही महिन्यांत मीडिया आउटलेटवरही कारवाई केली आहे, अनेक पत्रकार, विशेषत: महिलांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. दरम्यान, रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जागतिक बँकेने अलीकडेच म्हटले आहे की अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था दरडोई उत्पन्नात गेल्या चार महिन्यांत एक तृतीयांशपेक्षा जास्त घसरली आहे, जी खूपच गंभीर आहे. जागतिक बँकेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ टोबियास हक म्हणाले, ‘जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेला अफगाणिस्तान आता अधिक गरीब झाला आहे.’