Tahawwur Rana (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याच्या (26/11 Mumbai Attacks) प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले आहे. तुरुंगात बंद पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी व या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) लवकरच भारतात आणले जाऊ शकते. अमेरिकेच्या अपील न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पॅनेलने तहव्वूर राणाला भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर तहव्वूर राणाला राजनैतिक माध्यमातून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) 2008 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील तहव्वूर राणाच्या कथित भूमिकेची चौकशी करत आहे.

मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्यातील कथित भूमिकेसाठी भारताने प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की, तहव्वूर राणाला राजनयिक माध्यमातून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तहव्वूर राणाची याचिका फेटाळली-

राणाने दाखल केलेल्या अपीलवर निर्णय देताना, यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नाइन्थ सर्किटच्या न्यायाधीशांच्या पॅनेलने राणाची याचिका फेटाळून लावली. आता मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात त्याच्या कथित सहभागामुळे त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. याआधी तहव्वूर राणाने 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरोधात अपील केले होते, जे जिल्हा न्यायालयाने फेटाळले होते. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

जाणून घ्या कोण आहे तहव्वूर राणा-

मुंबई हल्ल्याच्या 405 पानांच्या आरोपपत्रात तहव्वूर राणाच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला असून, तो मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत होता. आरोपपत्रानुसार तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. (हेही वाचा: Bangladeshi Arrested in Maharashtra: एटीएसची मोठी कारवाई; बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना अटक)

मुंबई 26/11 हल्ला-

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी हल्ला करून अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. या घटनेत 166 लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 लोक जखमी झाले होते. या काळात काही अमेरिकन नागरिकही मारले गेले. 3 दिवस चाललेल्या ऑपरेशननंतर सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर अजमल कसाब नावाच्या दहशतवाद्याला अटक केली होती, ज्याला दीर्घ कायदेशीर लढाईनंतर 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती.