Diamond Trader Nirav Modi and Kingfisher Airlines Promoter Vijay Mallya (File Image)

Extradition Of Fugitives: भारतातील फरारी व्यावसायिकांविरोधात केंद्र सरकार आता कडक भूमिका घेणार आहे. नीरव मोदी (Nirav Modi), संजय भंडारी (Sanjay Bhandari) आणि विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांच्यावरील कारवाईबाबत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. फरार उद्योगपतींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक ब्रिटनला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतातून वाँटेड फरारी व्यावसायिकांच्या प्रत्यार्पणाला गती देण्यासाठी टीम लवकरच ब्रिटनला रवाना होणार आहे.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, संरक्षण व्यापारी संजय भंडारी, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासह भारतातील वाँटेड फरारी व्यावसायिकांचे प्रत्यार्पण करण्यासाठी टीम लवकरच ब्रिटनला रवाना होईल. ही टीम म्यूच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटी अंतर्गत ब्रिटिश अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा करेल.

ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा या टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या देखरेखीखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान, अधिकारी लंडनमध्ये उपस्थित असलेल्या फरारी व्यावसायिकांकडून मिळवलेल्या मालमत्ता आणि बँकिंग व्यवहारांची माहिती घेऊ शकतात. ब्रिटन आणि इतर देशांमध्ये त्यांची मालमत्ता ओळखण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असल्याचे या विकासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, विजय मल्ल्या 2016 मध्ये ब्रिटनला पळून गेला होता. भारतातील किंगफिशर एअरलाइन्सला अनेक बँकांनी दिलेल्या 9,000 कोटी रुपयांच्या कर्जाची त्याने परतफेड केलेली नाही. डिफेन्स डीलर संजय भंडारी हा रॉबर्ट वाड्रा यांच्या जवळचा मानला जातो. तपास यंत्रणा 2018 पासून वाड्रा आणि भंडारी यांच्यातील संबंधांचा तपास करत आहे. भंडारी याच्यावर यूपीए सरकारच्या काळात कमिशन मिळाल्याचा आरोप आहे. कमिशनच्या पैशातून त्याने लंडनमध्ये खरेदी केली ज्याचा फायदा रॉबर्ट वाड्राला झाला. (हेही वाचा: NITI Aayog- Decline In Poverty: सरकारी धोरणाचा परिणाम, दारिद्र्यरेषेतील मोठा बदल, NITI आयोगाच्या अहवालातून उघड)

यासह, हिरे व्यापारी नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेसोबत फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानुसार नीरवने त्याचा मामा मेहुल चोक्सीसोबत पीएनबीसोबत 4,500 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. 2018 मध्ये निरभ देश सोडून परदेशात पळून गेला होता. ईडीने यापूर्वीच संजय भंडारी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांची भारतातील संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्या आणि मोदी यांच्या मालमत्ता विकून हजारो कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली आहे.