ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्म युट्यूब (YouTube) मुळे, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 10,000 कोटी रुपयांचे योगदान आहे. यासह युट्यूब इकोसिस्टमद्वारे सुमारे 7.5 लाख लोकांना पूर्णवेळ नोकरीच्या समांतर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'च्या विश्लेषणाच्या आधारे 'यूट्यूब इम्पॅक्ट' अहवालात म्हटले आहे की, भारतातील 4,500 हून अधिक युट्यूब चॅनेलचे प्रत्येकी 1 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत.
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने युट्यूबच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी 4,021 युट्यूब वापरकर्ते, 5,633 क्रिएटर्स आणि 523 व्यवसायांचे सर्वेक्षण केले. भारतात, वार्षिक आधारावर 2021 मध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कमाई करणाऱ्या चॅनेलच्या संख्येत 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अहवालानुसार, युट्यूबच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टमने 2021 मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये 10,000 कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले आणि भारतीय अर्थव्यवस्थेत 7,50,000 पूर्ण-वेळ नोकऱ्यांइतके उत्पन्नाचे स्रोत प्रदान केले. (हेही वाचा: 2023 पर्यंत भारतातील 80% नवीन स्मार्टफोन 5G-सक्षम असतील- ICEA)
याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गाने आर्थिक परिणाम दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय युट्यूबने अनेक उपक्रमांना प्रेरणा दिली आणि पाठिंबा दिला, ज्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्याही दिसून आला. युट्यूबने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की त्याच्या प्लॅटफॉर्मवर 2021 मध्ये फक्त आरोग्याशी संबंधित व्हिडिओ 30 अब्जपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहेत.
अहवालात असे म्हटले आहे की, सध्या प्रत्येक 2 पैकी 1 युट्यूब युजर त्यांच्या नोकऱ्यांमध्ये चांगले काम करण्यासाठी आपले कौशल्य सुधारण्यासाठी युट्यूब वरील व्हिडिओ पाहत आहे. याशिवाय जवळपास 45 टक्के लोक यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून नोकरीसाठी नवीन कौशल्ये शिकत आहेत. 83% पालकांनी सहमती दर्शवली आहे की, युट्यूबने पूर्वीपेक्षा शिक्षण अधिक आनंददायक केले आहे.