व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी (CEO) निक रीड (Nick Read) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीसाठी अडचणी वाढल्या आहेत. आदित्य बिर्ला समूहाने असे म्हटले आहे की, जर सरकारने अॅडजस्ट ग्रॉस रेव्हेन्यू (AGR) साठी 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर मोठा दिलासा दिला नाही तर ते भारतातील कंपनीत जास्त गुंतवणूक करणार नाहीत. अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडिया दिवाळखोर होण्याची वेळ येईल. याच बाबत निक यांनी पंतप्रधानांची माफी मागितली आहे.
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाला (Vodafone Idea) आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत तब्बल 50,922 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाय रोवायला सुरुवात केल्यानंतर, प्रतिस्पर्धी कंपन्यांना दूरसंचार कंपन्यांमधील सुरू असलेल्या युद्धामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आर्थिक वर्षे 2019-20 च्या दुसऱ्या तिमाहीत नव्याने एकत्र आलेल्या या दोन कंपन्यांना 50,922 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीचा तिमाही तोटा हा भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान (Biggest Quarterly Loss) आहे.
यापूर्वी, टाटा मोटर्सला 2018 च्या डिसेंबर तिमाहीत 26,961 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. व्होडाफोन आयडियाचे उत्पन्न 22,114 कोटी रुपयांवरून घसरून 10,844 कोटी रुपयांवर आले आहे. वर्षाच्या सुरूवातीला कंपनीला 4.874 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या AGR Verdict नंतर कंपनीला शेवटच्या तिमाहीत इतके मोठे नुकसान सहन करावे लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या एजीआर निर्णयानंतर, व्होडाफोन-आयडियासह भारती एअरटेलचे दुसर्या तिमाहीतही मोठे नुकसान झाले. दुसर्या तिमाहीत एअरटेल कंपनीला 23,045 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
याआधी कंपनीच्या आर्थिक नुकसानीवर बोलताना निक रीड म्हणाले होते, 'भारत बर्याच काळापासून 'खूपच आव्हानात्मक राहिला आहे, पण व्होडाफोन आयडियाकडे अजूनही 300 दशलक्ष ग्राहक आहेत जे बाजारपेठेच्या आकारमानाच्या 30 टक्के आहेत. प्रतिकूल नियम, जास्त कर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नकारात्मक निर्णयामुळे या कंपनीवर मोठा आर्थिक बोजा आहे.' याच वक्यव्याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोडी यांची माफी मागितली आहे. (हेही वाचा: आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीने मागितली केंद्र सरकारकडे मदत)
गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या AGR Verdict मध्ये टेलिकॉम कंपन्यांना सरकारची 92.641 कोटी रुपयांचे थकबाकी भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयामध्ये भारती एअरटेलला 21,700 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले गेले, तर व्होडाफोन-आयडियाला 28,300 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. यामुळेच दोन्ही कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. दरम्यान, 19 ऑक्टोबरला ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन आयडियाचे 37..5 कोटी ग्राहक आहेत. एअरटेलचे 32.79 कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स जिओचे 34.9 कोटी ग्राहक आहेत. त्यानुसार व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलचे संयुक्तपणे 70 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.