आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीने मागितली केंद्र सरकारकडे मदत
Vodafone Idea company (PC - Wikimedia Commons )

गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन आणि आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. या खासगी कंपन्याना या तिमाहीतील सर्वात जास्त तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे आता या कंपन्यानी केंद्र सरकराकडे कंपनी वाचवण्यासाठी मदत मागितली आहे. सरकारने मदत केली नाही तर, कंपन्या बंद पडतील, असेही व्होडाफोन-आयडियाने याचिकेमध्ये म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एजीआरवर दिलेल्या निर्णयानंतर थकबाकीची रक्कम भरण्यामुळे व्होडाफोन, आयडीया आणि एअरटेल या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण जवळपास 74 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामध्ये व्होडाफोन आयडिया यांचे 50 हजार 921 कोटी तर एअरटेलचे 23 हजार 45 कोटी येवढे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. (हेही वाचा - हेल्पलाईनच्या नावाखाली येणाऱ्या फोनबाबत सावधान, मिनिटांमध्ये खाली होईल बँक खाते)

सध्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्याची आर्थित स्थिती अत्यंत वाईट आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये व्होडाफोन-आयडियाचा निव्वळ तोटा 509 अब्ज रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 2017 मध्ये व्होडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्यांचे विलिनीकरण करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर या कंपन्याना तोटाचं सहन करावा लागला. आता या कंपन्यानी केंद्र सरकारकडे मदतीसाठी याचना केली आहे. सरकारकडून काही मदत मिळाली नाही तर, कंपनी सुरू ठेवणे अशक्य असल्याचे व्होडाफोन-आयडियाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली आहे.