5G सेवेनंतर आता देशात 6G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी सांगितले की, या दशकाच्या अखेरीस म्हणजेच 2030 पर्यंत देशात 6G सेवा सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या देशात 3G आणि 4G सेवा उपलब्ध आहे व येत्या काही महिन्यांत 5G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (TRAI) 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, येत्या 15 वर्षांत 5G देशाच्या अर्थव्यवस्थेत $ 450 अब्ज योगदान देणार आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला आणि रोजगाराला चालना मिळेल. 21 व्या शतकातील कनेक्टिव्हिटी देशाच्या प्रगतीचा वेग ठरवेल, असेही ते म्हणाले.
पीएम मोदी ते म्हणाले की, यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकमधील विकासाला गती मिळेल. 21व्या शतकातील कनेक्टिव्हिटी देशाची प्रगती ठरवेल आणि त्यामुळे आधुनिक पायाभूत सुविधा तयार करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, एका टास्क फोर्सने दशकाच्या अखेरीस 6G नेटवर्क आणण्याचे काम सुरू केले आहे.
पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, 2G युग हे धोरण पक्षाघात आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक होते. टेलिडेन्सिटी आणि इंटरनेट वापरकर्ते वेगाने विस्तारत आहेत. भारतातील मोबाईल उत्पादन युनिट्स दोन वरून 200 हून अधिक झाली आहेत आणि देश आता जगातील सर्वात मोठे मोबाइल उत्पादन केंद्र बनले आहे. पीएम मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे भारत जगातील सर्वात स्वस्त टेलिकॉम डेटा प्रदान करणार्या देशांपैकी एक आहे. दूरसंचार क्षेत्रातील स्वदेशी 5G चाचणी हे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. (हेही वाचा: भारतात लाँच होणार iQOO Neo 6 स्मार्टफोन; जाणून घ्या 5G Smartphone चे खास स्पेसिफिकेशन्स आणि किंमत)
पंतप्रधानांनी या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील जारी केले आणि आयआयटी (IIT) मद्रासच्या नेतृत्वाखालील एकूण आठ संस्थांनी बहु-संस्था सहयोगी प्रकल्प म्हणून विकसित केलेल्या 5G चाचणी बेडचे देखील लोकार्पण केले. या प्रकल्पाशी संबंधित संशोधक आणि संस्थांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ‘मला माझे स्वतःचे, स्वत: निर्मित 5G चाचणी बेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रातील गंभीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.’