देशात 5G सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) च्या 5G सेवा काही शहरांमध्ये लाइव्ह झाल्या आहेत. जिओची 5जी सेवा बीटा ट्रायल अंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू झाली आहे, तर एअरटेलची 5जी सेवा Airtel 5G Plus नावाने आठ शहरांमध्ये सुरू झाली आहे. आता 5जी सुरू झाल्याने सायबर चोरही सक्रिय झाले आहेत. 5जी सिम अपग्रेड नावाच्या लिंकवर क्लिक करताच लोकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत. या संदर्भात पोलिसांनी लोकांना सतर्क केले आहे.
ABPlive (तेलुगु) च्या वृत्तानुसार, 5जी सिम अपग्रेडबाबत अनेकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. 5जी सिम अपग्रेडच्या नावाने आलेल्या मेसेजच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा लोकांचा दावा आहे. लोकांना वाटत आहे की, त्यांच्या टेलिकॉम कंपनीनेच सिम अपग्रेड करण्यासाठी लिंक पाठवली आहे, परंतु प्रत्यक्षात ही लिंक सायबर चोरांनी पाठवली होती.
लोकांच्या 5जी बद्दलच्या उत्साहाचा फायदा सायबर चोर घेत आहेत. हॅकर्स लोकांचे फोन हॅक करत आहेत आणि संदेशासोबत पाठवण्यात आलेल्या लिंकद्वारे डेटा चोरत आहेत. पोलिसांच्या सायबर टीमने लोकांना अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये 4G वरून 5जी वर अपग्रेड करण्याबाबत भाष्य केले आहे. याशिवाय, टेलिकॉम कंपन्यांनी देखील सांगितले आहे की, तुम्हाला सिम बदलण्याची किंवा अपग्रेड करण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही. (हेही वाचा: आठ शहरांमध्ये लॉन्च झाले 'एअरटेल 5जी नेटवर्क'; मिळणार 30 पट वेगवान स्पीड, जाणून घ्या सविस्तर)
त्यामुळे 4जी सिम घाईघाईने 5जी सिममध्ये बदलण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब केल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, 5जी Realme, Xiaomi, Motorola, Samsung सारख्या सर्व कंपन्यांच्या 5जी फोनला सपोर्ट करत आहे. मात्र आयफोन वापरकर्त्यांना यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. यासाठी Apple कडून अपडेट जारी झाल्यानंतर ते 5जी सेवा वापरू शकतील.