Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच टेक उद्योगाला (Tech Industry) अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ही आव्हाने असूनही उद्योगाने काही प्रमाणात कर्मचारी आणि फ्रेशर्सना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या, मात्र 2024 मध्ये टेक कंपन्यांनी तितक्याच प्रमाणात नोकरकपातही केली. या टाळेबंदीचा हजारो कर्मचाऱ्यांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. एआयचा वाढता वापर, कंपन्यांची होत असलेली पुनर्रचना, उद्योगाची कमी मागणी, जागतिक स्पर्धा, अशा अनेक कारणांनी कंपन्या सध्या आर्थिक संकटात आहेत. याच कारणामुळे ज्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत ते नवीन नोकरी शोधू शकत नाहीत.

इंटेल, डेल, सिस्को, सॅमसंग, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि उद्योगातील इतर मोठ्या कंपन्यांनी या वर्षातील सर्वात मोठ्या आयटी टाळेबंदीची घोषणा केली. या टेक दिग्गजांनी विक्री आणि विपणन, प्रोग्रामिंग, एआर विभाग आणि यापुढे आवश्यक नसलेल्या प्रकल्पांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकणे सुरू ठेवले आहे. लेऑफ ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, 2024 मध्ये 451 टेक कंपन्यांनी सुमारे 1,39,206 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. महत्वाचे म्हणजे, टेक स्टार्टअप्सनी सकारात्मक वाढ नोंदवूनही अनेक कामगारांना कामावरून काढून टाकले.

सिस्कोने या वर्षाच्या सुरुवातीला 4,200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. ॲमेझॉनने आपल्या विविध विभागांतील सुमारे 400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटने आपल्या 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची घोषणा केली आहे. पॅरामाउंट ग्लोबलने सांगितले की त्यांनी आपल्या 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. नोकियाने भारतातील सुमारे 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये, इंटेल, आयबीएम, सिस्कोसारख्या कंपन्यांनी टाळेबंदीची घोषणा केली, ज्यामुळे 27,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. इंटेल आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये 15 टक्के कपात करत आहे, ज्यामुळे 15,000 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. डेलने सुमारे 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. (हेही वाचा: Amazon Return to Office Rule: Amazon चे कर्मचारी 5 दिवस कार्यालयात परतण्याच्या नियमामुळे संतापले, 73% कर्मचारी सोडणार जॉब)

अशाप्रकारे  2024 मध्ये नोकरकपातीचा 1 लाखाचा टप्पा चिंतेची बाब दर्शवतो. वर्ष संपण्यापूर्वी आणखी काही जण पुढील काही महिन्यात त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात. दरम्यान, टाळेबंदीची लाट केवळ तंत्रज्ञान उद्योगापुरतीच मर्यादित नाही, तर इतर अनेक क्षेत्रातील जागतिक कॉर्पोरेशन्सनी आर्थिक आव्हानांची कारणे देत कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणीय कपात केली आहे.