अंतराळातील गूढ अगम्य गोष्टींचे नवल आजही कायम आहे, जवळजवळ प्रत्येक देश पृथ्वीबाहेरील रहस्ये शोधण्याच्या मार्गावर आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, नवनवीन यानांची निर्मिती होत आहे, एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगवर सरकार लाखो रुपये खर्च करत आहे पण अजूनही पृथ्वीवरील विमानांच्या उड्डाणांवर शास्त्रज्ञांना किंबहुना तंत्रज्ञानाला पूर्णतः नियंत्रण ठेवता आले नाही.
विमानसेवेमुळे जग जवळ आले, एक खंडातून दुसऱ्या खंडात जाण्याचे मार्ग मोकळे झाले, आणि बघता बघता विमाने लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली. कित्येक विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या ‘आम्ही सर्वोत्तम आहोत’ अशी जाहिरात करू लागल्या मात्र विमानतंत्र विकसित करतांना तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली विमाने आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रवास करणारे प्रवासी यांच्या सुरक्षतेचा तितकासा विचार केला गेला? विमान प्रवासाशी निगडीत नुकत्याच घडलेल्या काही घटना पाहता याचे उत्तर ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.
२०१४ मध्ये मलेशिया एअरलाईन्सचे विमान MH ३७० ने तब्बल २३९ प्रवाश्यांना आपल्या पोटात घेऊन बीजिंगकडे झेप घेतली आणि बघता बघता रडार कक्षेतून नाहीसे होऊन पृथ्वीच्या नाकावर टिच्चून हे विमान गायब झाले, ज्याचा शोध अजून लागला नाही. मागच्या काही दशकातील विमानप्रवास संदर्भातील हा सर्वात मोठा अपघात म्हणावा लागेल. नुकतेच रशियन लष्कराचे ९१ प्रवासी असलेले विमान TU-१५४ सोची येथील उड्डाणानंतर २० मिनिटांतच रडारवरून गायब झाले. खूप शोधाशोध केल्यानंतर काळ्या समुद्रात या विमानाचे अवशेष सापडले. याचा अर्थ अजूनही निर्माण केले गेलेले तंत्रज्ञान किंवा ते वापरत असलेल्या तंत्रज्ञांमधील समन्वयामध्ये नक्कीच काही त्रुटी आहेत.
विकसित देशांनी काळाबरोबर त्यांची रडार यंत्रणा विकसित करायला सुरुवात केली. करोडो रुपये खर्चून आकाशासोबतच समुद्राचा पृष्ठभाग आणि तळही बऱ्याच देशांनी काबीज केला. सध्याच्या रडार तंत्रज्ञानानुसार त्या त्या देशांच्या एअर ट्राफिक कंट्रोल (ए.टी.सी.) कक्षेत येणारे प्रत्येक विमान ओळखता येऊ शकते. ए.टी.सी. हे विमानाचे उड्डाण, त्यांचे मार्ग नियंत्रित करते, गरज वाटेल तिथे सल्ला देते, हवामान किंवा इतर वातावरणीय बदलाची माहिती देते. असे असूनही एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क (ए.से.ने)च्या सध्याच्या आकडेवारीनुसार १९४८ पासून जवळजवळ ८८ पेक्षा जास्त विमाने उड्डाणानंतर कोणतेही निशाण मागे न ठेवता गायब झाली आहेत ज्यांच्या अजून कोणताही शोध लागला नाही. याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञान असूनही उड्डाणानंतर विमान पृथ्वीच्या संपर्कात राहिलच याचा काही भरवसा नाही.
सध्या आकाशातील विमाने ओळखण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन रडार यंत्रणांचा उपयोग होतो. प्राथमिक रडार यंत्रणेमध्ये चुंबकाच्या सहाय्याने विमानाचे स्थान ओळखता येते तर दुय्यम यंत्रणेमध्ये जमिनीवरून त्या विमानाकडे सिग्नल्स पाठवून, विमानाकडून मिळालेल्या उत्तरावर विमानाचे स्थान निश्चित करता येते. रडार यंत्रणा ठीक आहे मात्र त्या वेळच्या परिस्थितीमुळे विमानाचा संपर्क तुटला असे म्हटले तर, आंतरखंडीय विमाने ही ए.टी.सी.शी संपर्कात राहण्यासाठी सॅटेलाईटवर अवलंबून असतात. वातावरणाच्या बदलाची माहिती ए.टी.सी.ला असतेच त्यामुळे खराब वातावरणात विमानाच्या उड्डाणाचा प्रश्नच नाही. इंधनाचाही प्रश्न नाही, काही कारणास्तव विमानाचा स्फोट झाला असे म्हणावे तर या गायब झालेल्या विमानांच्या बाबतीत ही माहितीही ए.एस.एन.कडे नाही. सध्या Aircraft Communications Addressing and Reporting System (ए.सी.ए.आर.एस) ही नवी यंत्रणा उड्डाणासंदर्भातील प्रत्येक छोटी मोठी माहिती देण्यासाठी तसेच काही गंभीर बाब उद्भवल्यास जमिनीवरील स्थानकांशी संवाद साधण्यासाठी वापरली जाते. उड्डाणानंतर विमानाच्या हालचाली टिपण्यासाठी बऱ्याच विमानसेवा हीच यंत्रणा वापरत आहेत. आणि हीच यंत्रणा Air France ४४७ या विमानातही होती की जे २००९ साली अटलांटिक महासागरात गायब झाले आणि जवळ जवळ दोन वर्षांनी त्याचा सुगावा लागला. अश्या सर्व अद्ययावत यंत्रणा असूनही रडारच्या कक्षेतून विमान गायब होणे आणि त्याचा शोध न लागणे हे एक गूढच म्हणावे लागेल. आणि यामुळेच दरवर्षी विमानाने प्रवास करणाऱ्या ३ बिलिअन प्रवाश्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आणि याच मुळे पुढे जाऊन पृथ्वीच्या सुरक्षततेचा प्रश्न उद्भवू शकतो. कारण आकाशातील विमाने नक्की जातात कुठे यापुढे अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
या सर्व विमानांचा शोध घेण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले, प्रचंड वेळ गेला. पण काहीच सध्या झाले नाही. मात्र प्रत्येक देशाकडे विकसित तंत्रज्ञान असले तरी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या पद्धतीने शोध घेतला जातोय, किंवा तंत्रज्ञानाच खरच वापर होत आहे का? त्यावर त्या त्या देशांच्या सरकारचे कसे नियंत्रण आहे याही गोष्टी कानाडोळा करता येणार नाहीत.
हे झाले तंत्रज्ञानाबद्दल, मात्र यामध्ये या तंत्रज्ञानाला हाताळणारे लोक यांचीही महत्वाची भूमिका आहे.
७.६ बिलिअन लोकसंख्या असलेल्या या जगात दरवर्षी लाखो लोक विमानसेवेचा उपभोग घेतात. एखाद्या बस स्थानकावरून ज्या संख्येने बसेस बाहेर पडतात किंबहुना त्यापेक्षा जास्त विमाने विमानतळातून उड्डाणे घेतात. ज्यामुळे साहजिकच एअर ट्राफिक इतके वाढले आहे की लँड होण्यासाठी कधी कधी विमानांना आकाशात घिरट्या घालत वाट पाहावी लागते. ज्यासाठी खचितच कुशल, अनुभवी वैमानिकांची गरज आहे, जमिनीवरील स्थानकामधून नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियंत्रकाची गरज आहे. ज्यामुळेच उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच हवा तसा आणि हवा तिथे वापर होऊ शकतो. आता आपली अशाप्रकारच्या लोकांची गरज खरच पूर्ण होत आहे का? किंवा विमानसेवेशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जे ट्रेनिंग दिले जाते ते पुरेसे आणि योग्य आहे का? नवीन तंत्रज्ञान, मशीन्स आणि मनुष्य यांच्यात खरच मेळ आहे? कमर्शिअल विमाने चालवण्यासाठी वैमानिकाकडे कमीत कमीत २५०-५०० तास विमान चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे मात्र अशा प्रकारचे निकष खरच पाळले जातात? आपले वैमानिक खरच विमान उड्डाणासाठी तयार आहेत का ते इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या दबावाला बळी पडत आहेत? यासारखे एक ना अनेक प्रश्न उद्भवले आहेत. म्हणजे फक्त तंत्रज्ञानच नाही तर ते नियंत्रित करणारा मनुष्यही अशा प्रकारच्या घटनांसाठी तितकाच जबाबदार ठरू शकतो.
२८ डिसेंबर १८५६ रोजी अशा प्रकारे विमान गायब होण्याची पहिली नोंद आहे, तिथपासून C-GDTK या विमानाने ८ जून २९१७ मध्ये लेथब्रिज, अल्टा येथून आकाशात झेप घेतली. क्रॅनब्रुक येथे ते इंधन भरण्यासाठी थांबले होते मात्र त्यानंतर ते त्याच्या पोहोचण्याच्या जागी पोहचलेच नाही. अशा प्रकारे गायब झालेले ते शेवटचे विमान ठरले. याचा शोध अजूनही चालूच आहे.
विमान उड्डाणानंतर त्याची प्रत्येक हालचाल, त्याचे स्थान, त्याचा वेग, त्याचा मार्ग ते कोणत्या ए.टी.सी. कक्षेतून जात आहे अशा सर्व छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती जमिनीवर पोहोचणे गरजेचे आहे कारण आपल्या जवळच्या व्यक्तीला प्लेन क्रॅशमध्ये गमावणे ही काही साधी गोष्ट नाही मात्र त्याच व्यक्तीला गायब होणाऱ्या विमानासोबत गमावणे आणि त्याच्या काहीही थांगपत्ता न लागणे ही खूप भयावह गोष्ट आहे. आत्तापर्यंत अशाप्रकारे गायब होणाऱ्या व्यक्तींची संख्या ही जवळजवळ १६१५ इतकी आहे. ज्यांची जबाबदारी नाही सरकारने घेतली आहे नाही एटीसीने. आणि आजही या लोकांचे नातेवाईक या आशेवर आहेत की कधीतरी या गायब झालेल्या विमानांचा शोध लागला जाईल आणि या प्रवाश्यासंदर्भातील एखादी बातमी तरी प्राप्त होईल.