Pune-Based Teenager Clics Moon Pic. (Photo Credits: ANI Twitter)

लहानपणापासूनच आपल्या सर्वांना चंद्राबाबत (Moon) फार कुतूहल आणि उत्सुकता असते. पृथ्वीपासून सर्वात जवळील लघुग्रह म्हणून चंद्राबाबत फार रिसर्चही झाला आहे. मात्र आतापर्यंत शक्यतो आपण चंद्राच्या कृष्णधवल प्रतिमाच पहिल्या आहेत. आता पुण्याच्या 16 वर्षाच्या प्रथमेश जाजूने (Prathamesh Jaju) चंद्राची अत्यंत सुंदर, स्पष्ट आणि रंगीत छायाचित्रे काढली आहे. ही छायाचित्रे सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. प्रथमेशने एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 हजाराहून अधिक प्रतिमा एकत्र करून हे विलक्षण छायाचित्र बनवले आहे.

व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये चंद्र अगदी स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नाही तर चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डेदेखील सहज दिसू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एक छायाचित्र तयार करण्यासाठी प्रमेश जाजूने 50 हजार फ्रेम वापरल्या आहेत, प्रथमेश जाजू स्वत: ला नवशिक्या खगोलशास्त्रज्ञ म्हणवतो. त्याने सांगितले की, त्याने मोठ्या संख्येने प्रतिमा कैद केल्या, ज्यांचा आकार सुमारे 186 जीबी होता. इतक्या मोठ्या आकाराच्या प्रतिमांचे प्रोसेसिंग करताना त्याचा लॅपटॉप जवळजवळ खराब झाला होता, असेही तो सांगतो.

जेव्हा प्रोसेसिंग पूर्ण झाली,  तेव्हा प्रतिमा 50 मेगापिक्सेलची होती. ही प्रतिमा मोबाइलवर पाहता यावी यासाठी त्याने त्याचा आकार अजून कमी केला. कंपोस्टिंग (Composting) हे तंत्र सहसा छायाचित्रणात वापरले जाते. यामध्ये भिन्न व्हिज्युअल सोर्समधील प्रतिमा एकत्र केल्या जातात आणि असा प्रभाव पाडला जातो की, पाहणाऱ्याला वाटावे की जणू काही ही प्रतिमा एकाच दृश्याचा भाग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Jaju (@prathameshjaju)

जाजूने या छायाचित्राचे नाव 'लास्ट क्वार्टर मिनरल एचडीआर मून' (Last Quarter Mineral HDR Moon) असे ठेवले आहे. प्रथमेशने सांगितले की, त्याने प्रथम चंद्राच्या छोट्या छोट्या भागाचे 38 व्हिडिओ घेतले. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुमारे 2000 फ्रेम असतात. त्यांना स्टेबलाईझ करून ते एका चित्रामध्ये रूपांतरित केले आणि नंतर त्यापासून चंद्राचे संपूर्ण एक छायाचित्र तयार केले. (हेही वाचा: यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे दिवशी; पहा ग्रहणाचा कालवधी, सुतक काळ असेल का? सह सारी महत्त्वाची माहिती)

या छायाचित्रात चंद्राचा रंगही वेगवेगळ्या प्रकारचा दिसत आहे, जो सहसा तसा दिसत नाही. जाजूने म्हटले आहे की, प्रत्येक रंग चंद्रावरील खनिजे दर्शवितो. निळ्या रंगात अशी काही क्षेत्रे आहेत जिथे लोह, टायटॅनियम आणि ऑक्सिजनपासून बनविलेले इल्मेनाइट आहे आणि जेथे याचे प्रमाण कमी आहे तेथे केशरी आणि जांभळा रंग दिसतो. जास्त सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी पांढरा किंवा राखाडी रंग दिसतो.