आजची वैशाख पौर्णिमेची रात्र ही चंद्रग्रहण (Chandra Grahan) देखील घेऊन आली आहे. सोबतच आजचं चंद्र दर्शन हे सुपर फ्लॉवर ब्लड मून (Super Flower Blood Moon) आहे. भारतामध्ये आज चंद्रग्रहण सर्वत्र थेट पाहता येणार नाही पण ईशान्य भारताचा काही भाग, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार या प्रदेशात मात्र चंद्रग्रहणाच्या शेवटच्या काळातील काही भाग दिसू शकतो. पण तुम्ही भारताच्या इतर भगात असाल आणि तुम्हांला हे चंद्रग्रहण पहायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून तुम्ही आज ही अवकाशातील खगोलीय घटना पाहू शकता.
भारतामध्ये कधी, कुठे दिसू शकेल चंद्रग्रहण
26 मे च्या संध्याकाळी चंद्रग्रहणाच्या शेवटच्या टप्प्यातील काही भाग उत्तर ईशान्य भारतातील राज्यांमधून दिसू शकतो. त्याला सिक्कीम अपवाद असेल. सोबतच पश्चिम बंगाल, ओडिसा, अंदमान निकोबारचा काही भाग अशा भागातून चंद्रग्रहण दिसू शकतं. हे काही प्रमाणात दिसणारं चंद्रग्रहण 3 वाजून 15 मिनिटांनी तर चंद्रग्रहणाचा पूर्ण भाग 4 वाजून 39 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यानंतर 4.58 ला पूर्ण ग्रहण संपेल तर पार्शिअल फेज मधील चंद्रग्रहण संपण्यासाठी 6 वाजून 28 मिनिटांपर्यंत वाट पहावी लागेल. (नक्की वाचा: Chandra Grahan 2021: वर्षातील पहिले चंद्रग्रहण कधी? 'या' राशींमधील व्यक्तींना होणार धनलाभ).
चंद्रग्रहण इथे पहा
दरम्यान आज 26 मे चं चंद्रग्रहण हे यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. यानंतर 10 जूनला सूर्यग्रहण, 19 नोव्हेंबरला चंद्रग्रहण, 4 डिसेंबरला चंद्रग्रहण दिसणार आहे. आजच्या खग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असतो. या ग्रहणात पृथ्वीच्या सावलीमध्ये तो असल्याने चंद्रावर सूर्य किरणं पडत नाहीत. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात. त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस किंवा लालसर दिसतो.