प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

दिवाळीच्या पहिल्या आंघोळीनंतर म्हणजेच 25 ऑक्टोबरला 2022 या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण पार पडल्यानंतर आता 15 दिवसांतच यंदाच्या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) देखील होणार आहे. भारतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या (Tripurari Purnima) दिवशी यंदा खग्रास चंद्रग्रहण आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र ग्रस्तोदित आहे. याचाच अर्थ ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येणार आहे. त्यामुळे ग्रहण स्पर्श नसेल. भारतामध्ये पूर्वेकडील काही राज्यांमध्ये खग्रास अवस्थेमध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे. तर उर्वरित भागात ज्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असेल त्या भागात हे चंद्रग्रहण खंडग्रास असणार आहे.

चंद्रग्रहणाच्या वेळा, सुतककाळ आणि वेध काळ 

भारतामधील चंद्रग्रहणाची सर्वसाधारण वेळ ही संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटं ते 7 वाजून 27 मिनिटं इतकी आहे. चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित असल्याने 8 नोव्हेंबर दिवशी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाळले जातील. लहान मुलं, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता वेध पाळण्याचा कालावधी सकाळी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळेस काही नियम पाळण्याची रीत आहे. त्यानुसार रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. बाहेर न पडण्यास सांगितलं जाते. तसेच ग्रहणाच्या काळात काही धार्मिक स्थळ पूजा, अर्चा, दर्शन व्यवस्था बंद करतात. या काळात अन्न न खाण्याचा, न शिजवण्याचा देखील सल्ला काही जण पाळतात.

सूर्यग्रहणात ग्रहणापूर्वी 12 तास आधी सुतककाळ सुरू होतो तर चंद्र ग्रहणामध्ये हाच सूतककाळ 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे तुम्ही ग्रहणाच्या दिवशी जेथे असाल तेथे सुतककाळाच्या वेळा बदलू शकतात. मे महिन्यात एक चंद्रग्रहण झाले होते पहा त्याचे विहंगम फोटोज.

यंदाच्या वर्षातलं हे शेवटचं चंद्रग्रहण भारतासह अनेक आशियाई भागात, पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तरी आणि दक्षिण अमेरिका, पॅसेफिक अटलांटिक आणि हिंद महासागरामध्ये दिसणार आहे. भारतामध्ये पटना, रांची, कोलकाता, सिलीगुड़ी, गुवाहाटी या ईशान्य भारताकडील भागात चंद्रग्रहण पाहता येणार आहे.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील गोष्टींची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.