चांद्रयान 2 (Chandrayaan 2 ) या भारताच्या बहुप्रतिक्षित चंद्रमोहिमेचा आता महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. इस्त्रोने (ISRO) दिलेल्या माहितीनुसार, आज (14 ऑगस्टच्या) पहाटे चंद्रयानाने कक्षा बदलून चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. यानाची प्रगती योग्य दिशेने झाल्यास चांद्रयान 20 ऑगस्ट दिवशी चंद्राच्या ऑर्बिटमध्ये असेल. श्रीहरीकोटा येथून 22 जुलै दिवशी झेपावलेले यान 23 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरल्यानंतर आता चंद्रकक्षेमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने झेपावले आहे. ISROची महत्वाकांक्षी मोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी
पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर येऊन यान चंद्राकडे झेपावण्याच्या या प्रक्रियेला ट्रान्स लुनार इंजेक्शन (Trans Lunar Insertion ) असे म्हणतात. आता हे यान चंद्राच्या दिशेने रवाना होईल. पुढे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून जाईल. इस्त्रोच्या अंदाजानुसार, पुढील 8 दिवसांत म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी चंद्राजवळ पोहोचेल, त्यानंतर यानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येईल. आता विक्रम लॅन्डर 2 सप्टेंबरला ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यामुळे एकूण अंदाजानुसार, 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 चंद्रावर उतरेल.
ISRO Tweet
Today (August 14, 2019) after the Trans Lunar Insertion (TLI) maneuver operation, #Chandrayaan2 will depart from Earth's orbit and move towards the Moon. pic.twitter.com/k2zjvOBUE6
— ISRO (@isro) August 13, 2019
चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर होते. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III)या प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.