Chandra Grahan July 2020 Date And Time: 5 जुलै दिवशी गुरू पौर्णिमा दिवशी  छायाकल्प चंद्रग्रहण; भारतामधून मात्र नाही दिसणार
Crescent Moon Sighting. (Photo Credits: Wikimedia Commons)

आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गूरू पौर्णिमे दिवशी यंदा चंद्र ग्रहण आहे. हे यंदा वर्ष 2020 मधील चौथं ग्रहण आहे. दरम्यान 5 जुलै दिवशी यंदा गुरू पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण हे दोन्ही योग एका दिवशीच जुळून आले आहेत.यंदा सलग तिसर्‍या वर्षी गुरू पौर्णिमेदिवशी चंद्र ग्रहण आहे. देशभरात गुरू बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. 5 जुलैचे चंद्र ग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे. या ग्रहणामध्ये चंद्रावर पृथ्वीची सावली पडणार आहे. अशा ग्रहणामध्ये प्रभाव आणि सूतक काळ पाळण्याची प्रथा नाही.

दरम्यान गुरू पौर्णिमा म्हणजे 5 जुलै दिवशीचे चंद्र ग्रहण दिवसा होणार असल्याने भारतामधून दिसणार नाही. मात्र उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या पश्चिमेकडील काही भागातून ग्रहण दिसणार आहे.

भारतीय वेळेनुसार चंद्र ग्रहणाची वेळ आणि तारीख

छायाकल्प चंद्रग्रहण 5 जुलै दिवशी होणार आहे. हे ग्रहण सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी सुरू होईल तर 9 वाजून 59 मिनिटांनी सर्वोच्च स्थानी पोहचेल. तर 11 वाजून 22 मिनिटांनि संपणार आहे. हे ग्रहण सुमारे 2 तास 43 मिनिटं 24 सेकंद वेळेचे असेल.

चंद्र ग्रहणामध्ये चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत सरळ अशा स्थितीमध्ये असतात. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहण ही एक सामान्य अवकाशीय घटना आहे. मात्र हिंदू मान्यतांनुसार या काळात शुभं काम केली जात नाहीत. प्रामुख्याने नवजात बालकं, गरोदर स्त्रिया यांना विशेष जपलं जातं. मात्र हे करणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. त्याला कोणताही वैज्ञानिकपुरावा नाही.