Romance Scam in India: व्हा सावध! भारतामध्ये वाढत आहेत 'ऑनलाइन डेटिंग घोटाळे'; सोशल मिडियावर प्रेम शोधण्याच्या नादात फसवणुकीला बळी पडत आहे लोक
Romance Scam (Photo Credit : Pixabay)

Romance Scam in India: कोविड-19 महामारीनंतर प्रेमाचे आमिष दाखवून लोकांना फसवण्याच्या (Romance Scam) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक याआधीही होत आली आहे, मात्र साथीच्या रोगामुळे, लोकांमधील एकटेपणा आणि त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता वाढली यामुळे अशा लोकांना लक्ष्य करणे सोपे झाले. गेल्या 2 वर्षांत 'डिजिटल रोमान्स स्कॅम'ची संख्या झपाट्याने वाढली आहे. आता व्हॅलेंटाईन डे जसजसा जवळ येत आहे, तसतसे भारतामध्ये प्रणय अथवा रोमान्स घोटाळे वाढत आहेत.

सायबर-सुरक्षा संशोधकांनी सोमवारी सांगितले की, भारतात 66 टक्के लोक ऑनलाइन डेटिंग घोटाळ्याचे बळी ठरले आहेत. मागील वर्षी, 2023 मध्ये 43 टक्के भारतीय एआय व्हॉईस घोटाळ्याचे बळी ठरले आणि 83 टक्के लोकांनी त्यांचे पैसे गमावले. एक्सपोजर मॅनेजमेंट कंपनी टेनेबलच्या नवीन अहवालानुसार, ऑनलाइन डेटिंग घोटाळ्यांमध्ये अलिकडच्या वर्षांत एक मोठे परिवर्तन झाले आहे, जिथे जनरेटिव्ह एआय आणि डीपफेक्स सारख्या प्रगत तंत्रज्ञानांचे पारंपारिक फसवणूक पद्धतींमध्ये विलीनीकरण झाले आहे.

एआयद्वारे निर्माण केलेले डीपफेक इतके उत्तम प्रकारे काम करतात की, दोन तृतीयांश (69%) पेक्षा जास्त भारतीय म्हणतात की ते एआयचा आवाज आणि खऱ्या व्यक्तीचा आवाज यातील फरक ओळखू शकत नाहीत. म्हणूनच ऑनलाइन डेटिंग घोटाळ्यांमध्ये अधिक विश्वासार्ह व्यक्ती तयार करण्यासाठी स्कॅमर आता जनरेटिव्ह एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा फायदा व मदत घेत आहेत. त्यामुळे टेनेबलचे कर्मचारी संशोधन अभियंता ख्रिस बॉयड यांनी याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: Cyber Fraud in India: गेल्या वर्षी सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचे 7,488.6 कोटी रुपयांचे नुकसान; यादीत महाराष्ट्र अव्वल)

अहवालात नमूद केले आहे की, हे घोटाळे अनेकदा फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर सुरू होतात आणि पीडितांच्या सुरक्षेशी तडजोड करतात. स्कॅमर्स विशेषतः वृद्ध व्यक्तींना लक्ष्य करतात. म्हणून एखाद्या व्यक्तीशी ऑनलाईन बोलणे सुरु केल्यावर त्यांचे केलेली पैशांची मागणी ही धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच एखाद्या व्यक्तीला आपली माहिती देताना त्याचे फोटो आणि व्हिडिओ तपासणे महत्त्वाचे आहे. बॉयड म्हणतात, ऑनलाईन प्रेम शोधणारे लोक अशा घोटाळ्यांना बळी पडू नयेत यासाठी जागरूकता आणि दक्षता अतिशय महत्वाचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे प्रणय घोटाळे इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचले आहेत की मागील वर्षी नेटफ्लिक्सने त्यावर 'टिंडर स्विंडलर' नावाची एक डॉक्युमेंट्री बनवली होती.