लोकसभा निवडणुकीनंतर (Post-General Election) मोबाईल फोन (Mobile Phone) वापरकर्त्यांना मोठा झटका बसू शकतो. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, निवडणुकीनंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांचे बिल सुमारे 25% वाढू शकते. अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) अलीकडच्या काही वर्षात चौथ्या टप्प्यातील दरवाढीची तयारी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे फोन बिल सुमारे 25% वाढू शकते. या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढणार आहे.
याआधी 2019 ते 2023 या कालावधीत टेलिकॉम कंपन्यांनी तीन वेळा शुल्क वाढवले होते. आता कंपन्या चौथ्यांदा दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. देशातील मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या, वाढती स्पर्धा आणि प्रचंड 5G गुंतवणुकीच्या दरम्यान त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये येत्या काही दिवसांत 25 टक्क्यांपर्यंत वाढ करून आर्थिक फायदा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील.
अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, टॅरिफ प्लॅनमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे दिसत असले तरी, शहरे आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या ग्राहकांसाठी ते सामान्य असेल. शहरी भागात राहणाऱ्या ग्राहकांचा खर्च 3.2 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याच वेळी, खेड्यांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांचा टेलिकॉमवरील खर्च 5.2 टक्क्यांवरून 5.9 टक्क्यांपर्यंत वाढेल. यामुळे देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल आणि जिओ यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. (हेही वाचा: Indian AI Platform Hanooman: तब्बल 98 जागतिक भाषांमध्ये लॉन्च झाला भारतीय एआय प्लॅटफॉर्म 'हनुमान'; मिळणार 12 भारतीय भाषांचाही सपोर्ट)
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत जिओची प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) 181.7 रुपये होती. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीसाठी भारती एअरटेलचा ARPU रुपये 208 होता आणि वोडाफोन-आयडियाचा 145 रुपये होता. डेलॉइट येथील दक्षिण आशिया टीएमटी इंडस्ट्री लीडर पीयूष वैश यांनी म्हटले आहे की, 5G वरील खर्चाची भरपाई करण्यासाठी दूरसंचार कंपन्या ARPU 10 ते 15 टक्क्यांनी वाढवू शकतात. अशा परिस्थितीत, वर्षाच्या अखेरीस ग्राहकांच्या प्लॅनमध्ये प्रति यूजर 100 रुपयांनी वाढ होऊ शकते.