नुकतेच प्रियंका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी तिचे समर्थन केले तर काहींनी टीका. आता चीनने (China) तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भाशय (Womb) तयार केल्याची बातमी आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनचा हात कोणीही धरू शकत नाही. मशीन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत रोज नवनवीन गोष्टी विकसित करणाऱ्या चीनने, आता बाळंतपणासारख्या गोष्टीसाठी यंत्रे तयार केली आहेत. आगामी काळात भ्रूण ते नवजात शिशूपर्यंतचे संपूर्ण काम लॅबमध्येच केले जाणार आहे. एवढेच नाही तर त्यांच्या प्राथमिक काळजीसाठी रोबोटिक नर्सेसदेखील (AI Nanny) असणार आहेत.
चिनी संशोधकांनी त्यांच्या ताज्या संशोधनात हे उघड केले आहे की, ज्याप्रमाणे भ्रूण मातेच्या पोटात विकसित होतो, तसाच तो प्रयोगशाळेत विकसित केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे अशा कृत्रिम गर्भाशयातही बाळाचा विकास होण्यासाठी 9 महिने लागतील. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या कृत्रिम गर्भात जन्मलेल्या बाळाची काळजी घेणारा रोबोटही तयार करण्यात आला आहे, जो एका नर्सप्रमाणे त्याच्यावर सतत लक्ष ठेवेल.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, सुझोउ इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असलेल्या रोबोटिक सुईणांचा वापर केला आहे. त्या सध्या उंदरांवर लक्ष ठेवून आहेत. चिनी शास्त्रज्ञांचे हे संशोधन जर्नल ऑफ बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रकाशित झाले आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की, रोबोटिक सुईण आणि कृत्रिम भ्रूण अशा प्रकारे तयार केले गेले आहेत की संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या सुरू आहे. या रोबोटिक सुईणी शास्त्रज्ञांना काही चूक झाली की सावध करतात. (हेही वाचा: Pfizer and BioNTech कडून 5 वर्षांखालील मुलांना कोविड 19 लस देण्यासाठी Emergency Authorization चा अर्ज)
प्रयोगशाळेत मुलाचा विकास झाल्यामुळे त्यांचे जनुक सुधारणेही शक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम किंवा रोग टाळता येऊ शकतील. पालकांच्या गरजेनुसार मूल बनवता येईल. मुलामध्ये कोणते गुण ठेवायचे आणि कोणते कमी करायचे, हे स्वतः ठरवता येऊ शकेल. सोप्या भाषेत सांगायचे तर हे डिझायनर बेबी (Designer Babies) असेल. परंतु काही देशांनी चीनच्या प्रयोगाला अनैतिक म्हणत विरोध केला आहे. हे निसर्गाच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यासारखे असल्याचे सांगितले जात आहे.