AI to Hit Jobs: एआयमुळे जगभरातील 40% नोकऱ्या येऊ शकतात धोक्यात; IMF ने दिला इशारा, श्रीमंत देशांना जास्त धोका
Artificial Intelligence | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

AI to Hit Jobs: जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) बोलबाला झपाट्याने वाढत आहे. आता जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात एआयचा शिरकाव होत आहे. अशात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी एआयबाबत मोठा इशारा दिला आहे. क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील नोकरीच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरेल. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यापूर्वी आयएमएफ प्रमुख यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम करेल, मात्र एआय उत्पादकता वाढविण्याच्या संधीही निर्माण करेल.

नवीन आयएमएफ अहवालाचा हवाला देत जॉर्जिव्हा म्हणाल्या, एआयचा प्रभाव विकसनशील देशांमध्ये कमी असू शकतो, परंतु जागतिक स्तरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम प्रगत अर्थव्यवस्थांमधील 60 टक्के नोकऱ्यांवर होईल. तुमच्याकडे जितक्या उच्च-कुशल नोकर्‍या असतील, तितका प्रभाव जास्त असेल.

आयएमएफ अहवालात असेही म्हटले आहे की, एआयमुळे अपेक्षित असलेल्या निम्म्या नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. एआयमुळे वाढलेल्या उत्पादकतेचा फायदा इतरांना होऊ शकतो. जॉर्जिव्हा पुढे म्हणाल्या, ‘यामुळे तुमची नोकरी पूर्णपणे जाऊ शकते किंवा तुमची नोकरी आणखी वाढवू शकते. एआयद्वारे तुम्ही प्रत्यक्षात अधिक उत्पादक व्हाल आणि तुमच्या उत्पन्नाची पातळी वाढू शकते.’

क्रिस्टालिना म्हणाल्या, आपण तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. यामुळे उत्पादकता वाढेल, जागतिक विकासाला गती मिळेल आणि जगभरातील उत्पन्न वाढेल. पण, नोकऱ्या गमावण्याचा धोका नाकारता येत नाही. एआयमुळे जास्त पगाराच्या नोकऱ्याही धोक्यात येतील. यापूर्वीही ऑटोमेशन आणि आयटीचा नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. पण एआय या सर्वांपेक्षा वेगळे आहे. उच्च-कुशल नोकऱ्यांवरही याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. (हेही वाचा: AI Death Calculator: आता जाणून घेता येईल नक्की कधी होईल तुमचा मृत्यू; एआय टूल व्यक्त करणार अंदाज, जाणून घ्या सविस्तर)

त्या म्हणाल्या, 2024 हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कठीण वर्ष असू शकते. कोरोनाच्या काळात घेतलेल्या कर्जाच्या सापळ्यातून जग अद्यापही सुटू शकलेले नाही. त्याच वेळी, यावर्षी जगातील 80 हून अधिक देशांमध्ये निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत, सरकार लोकांना आकर्षित करण्यासाठी पैसे खर्च करतील, यामुळे देशांचे कर्ज आणखी वाढेल.