AI Death Calculator: बहुतेक लोकांना त्यांचे आयुष्य किती काळ असेल हे जाणून घ्यायचे असते, परंतु त्यांचा मृत्यू नेमका कधी होईल हे जाणून घेण्यात बहुतेक लोकांना स्वारस्य नसते. याआधी मृत्यूबाबतचे केलेले अनेक दावे फोल ठरल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत एक खास आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल (AI Tool) उदयास आले आहे, ज्याबाबत दावा केला जात आहे की ते कोणाचा मृत्यू कधी होईल हे सांगू शकते. या एआय टूलची माहिती न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
डेन्मार्कच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सुनी लेहमन यांनी ते विकसित केले आहे. Life2vec नावाचे हे एआय टूल एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे (त्याचे उत्पन्न, व्यवसाय, राहण्याचे ठिकाण इ.) विश्लेषण करते आणि त्याच्या आयुर्मानाचा अंदाज लावते. त्याचे अंदाज जवळपास 75 टक्के खरे ठरल्याचे बोलले जात आहे. अहवालानुसार, लेहमनच्या टीमने 2008 ते 2020 दरम्यान डेन्मार्कमधील 6 दशलक्ष लोकांवर या एआय टूलसाठी संशोधन केले होते. (हेही वाचा: Cow Dung as Rocket Fuel: जगात प्रथमच गायीच्या शेणाचा वापर करून उडवले रॉकेट; जपानला अवकाश क्षेत्रात मोठे यश)
या एआय टूलचा अचूकता दर बऱ्यापैकी चांगला होता. 2020 पर्यंत कोणते लोक मरतील याबाबत कोणतीही चूक न करता अंदाज बांधला होता. त्याचे निर्माते म्हणतात की, त्यांनी 35 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांवर या मॉडेलची चाचणी घेतली, त्यापैकी निम्मे 2016 ते 2020 दरम्यान मरण पावले, त्यामुळे कोण मरणार आणि कोण जगणार याची 78 टक्के अचूक उत्तरे या मॉडेलने दिली.
या अभ्यासात, लवकर मृत्यू होण्यास कारणीभूत घटक देखील नमूद केले आहेत. हे घटक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या, नोकरी, उत्पन्न यांच्याशी संबंधित असल्याचे आढळले. हे मॉडेल डेन्मार्कच्या डेटाच्या आधारे तयार केले गेले आहे, त्यामुळे ते इतर देशांच्या डेटाची अचूक चाचणी करण्याची शक्यता थोडी कमी आहे. सध्या तरी हे एआय टूल अद्याप सामान्य लोकांसाठी किंवा कॉर्पोरेशन्ससाठी उपलब्ध नाही आणि अशी मॉडेल्स कंपन्यांच्या विशेषतः विमा कंपन्यांच्या हातात जाऊ नयेत, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.