Cow Dung as Rocket Fuel: अंतराळ प्रेमींसाठी जपानमधून (Japan) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. जपान रॉकेट इंधन म्हणून गायीच्या शेणाचा (Cow Dung) वापर करण्याच्या तयारीत आहे. इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज नावाची जपानी स्टार्टअप कंपनी भविष्यातील अंतराळ प्रवासाला एक नवे वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. जपानच्या अंतराळ उद्योगाने गुरुवारी अशा प्रोटोटाइप रॉकेट इंजिनची चाचणी घेतली. या रॉकेटमधील इंधन गायीच्या शेणापासून तयार केले होते. शेणापासून तयार करण्यात आलेल्या बायोमिथेनचा वापर करून हे रॉकेट उडवण्यात आले आहे.
बायोमिथेन इंधनाने भरलेल्या रॉकेटने ताकी शहरातील एका खुल्या हँगरच्या दारातून 10-15 मीटर (30-50 फूट) निळ्या आणि केशरी ज्वाला सुमारे 10 सेकंदांपर्यंत फेकल्या. इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी ताकाहिरो इनागावा यांनी सांगितले की, या रॉकेटसाठी वापरण्यात आलेले बायोमिथेन हे पूर्णपणे गायीच्या शेणापासून बनवले गेले आहे. ही मनोरंजक आणि यशस्वी चाचणी केवळ एक विज्ञान प्रयोग नाही, तर ती शाश्वत अवकाश संशोधनाच्या दिशेने एक मोठी झेप ठरू शकते. असे करणारी इंटरस्टेलर टेक्नॉलॉजी ही पहिली खाजगी कंपनी आहे.
इनागावा म्हणतात, ‘आम्ही हे केवळ पर्यावरणासाठी चांगले आहे म्हणून नाही तर ते स्थानिक पातळीवर तयार केले जाऊ शकते म्हणून करत आहोत. हे खूप किफायतशीर आहे आणि चांगली कार्यक्षमता आणि शुद्धता असलेले इंधन आहे. सध्या तरी मी असे म्हणू शकतो की भविष्यात हे इंधन अधिक वापरले जाऊ शकते.’ शेणखतापासून रॉकेट प्रक्षेपित करणाऱ्या इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज आणि एअर वॉटर फर्मचा विश्वास आहे की, भविष्यात या इंधनाचा वापर करून अवकाशात उपग्रहही स्थापित केले जाऊ शकतात. (हेही वाचा: अमेरिकेत ऍपल वॉचची नववी सीरिज आणि अल्ट्रा 2 ची विक्री थांबवणार कपंनी, जाणून घ्या एवढा मोठा निर्णय का घेण्यात आला)
दरम्यान, जपानची स्पेस एजन्सी JAXA ने सप्टेंबरमध्ये त्यांची ‘मून स्निपर’ मोहीम सुरू केली, परंतु एजन्सीच्या दोन मोहिमा गेल्या दोन वर्षांत अयशस्वी झाल्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये H3 आणि साधारणपणे विश्वासार्ह घन-इंधन एप्सिलॉन लाँच केल्यानंतर झालेल्या अपघातांनी जपान हादरले आहे. जुलैमध्ये एप्सिलॉन एस रॉकेटच्या चाचणीवेळी प्रक्षेपणानंतर 50 सेकंदात स्फोट झाला. अशा परिस्थितीत बायोमिथेन जपानच्या अंतराळ संस्थेसाठी मोठा आधार ठरू शकतो.