
आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानाने आपले मोठ्या प्रमाणावरील जीवन व्यापले आहे. हे संगणकांना मानवासारखी विचार करण्याची आणि कार्य करण्याची क्षमता देणारे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. यातून मशीन शिकू शकतात, समस्यांचे निराकरण करू शकतात आणि परिस्थिती समजून निर्णय घेऊ शकतात. आता एप्रिल 2025 मध्ये गुगल डीपमाइंडने (Google DeepMind) प्रसिद्ध केलेल्या एका संशोधन अहवालात असे सांगितले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता 2030 पर्यंत मानवासारखी बुद्धिमत्ता, म्हणजेच आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (AGI) प्राप्त करू शकेल.
मात्र यासोबत एक चेतावणीही दिली आहे की, जर हा एआय नियंत्रणात ठेवला नाही, तर तो मानवजातीसाठी ‘गंभीर धोका’ किंवा ‘कायमचा नाश’ करणारा ठरू शकतो. DeepMind चे प्रमुख डेमिस हस्साबिस यांनी म्हटले आहे की, 2025-30 या काळात एजीआय येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासारख्या जागतिक संस्थेची गरज आहे, जेणेकरून त्यावर नियंत्रण ठेवता येईल. यासह टेस्लाचे एलन मस्क यांचेही म्हणणे आहे की, 2030 पर्यंत एआय मानवाच्या सर्व बुद्धिमत्तेला मागे टाकेल. एआयच्या या प्रगतीमागे संगणकाची वाढती शक्ती, नवीन एल्गोरिदम आणि मोठ्या प्रमाणात डेटा हे कारण आहे.
उदाहरणार्थ, आजचे एआय मॉडेल्स भाषा समजू शकतात, चित्रे ओळखू शकतात आणि जटिल खेळांमध्ये मानवाला हरवू शकतात. पण एजीआय म्हणजे असा एआय जो केवळ एकच काम नाही, तर सगळ्या क्षेत्रांत मानवासारखी विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता ठेवेल. मस्क यांच्या मते, हा एआय इतका प्रगत असेल की, तो एकट्या माणसापेक्षा हुशार असेल आणि नंतर सर्व मानवजातीच्या बुद्धिमत्तेला ओलांडेल. पण ही प्रगती इतक्या लवकर होईल का, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत.
आज एआयचा वापर आरोग्यसेवेत रोग शोधण्यासाठी आणि शेतीत पीक उत्पादनाचा अंदाज लावण्यासाठी केला जात आहे. उदाहरणार्थ, मुंबईतील रुग्णालयांमध्ये एआयचा वापर करून कर्करोगाचे निदान जलद होत आहे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन शेती नियोजनात मदत मिळत आहे. पण ही प्रगती इतकी सोपी नाही. 2025 मध्ये झालेल्या एएएआय परिषदेत 475 संशोधकांपैकी 76 टक्क जणांनी सांगितले की, केवळ सध्याच्या तंत्रज्ञानावर वाढ करून एजीआय साध्य होणार नाही, त्यासाठी नवीन पद्धतींची गरज आहे. याचा अर्थ, अजूनही अनेक तांत्रिक अडचणी आणि प्रश्न उभे आहेत. (हेही वाचा: ChatGPT च्या मदतीने Aadhaar Card बनवणं शक्य; जाणून खरे आणि खोटे आधार कार्ड कसं ओळखायचे?)
एजीआयच्या आगमनाने अनेक संधी मिळतील. शिक्षणात वैयक्तिक शिकवणी सुधारेल, आरोग्यसेवेत नवीन औषधे शोधणे सोपे होईल आणि दैनंदिन कामे स्वयंचलित होतील. पण यासोबतच धोकेही आहेत. जर एआयचा गैरवापर झाला, तर नोकऱ्या कमी होऊ शकतात, सामाजिक असमानता वाढू शकते आणि अगदी मानवजातीवर नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या प्रगतीमुळे अनेक संधी आणि धोकेही समोर येत आहेत. पण यासोबतच प्रश्न उभा राहतो की, आपण या प्रगतीसाठी तयार आहोत का? 2030 हे वर्ष आता फार दूर नाही, आणि त्या वेळी एआय आपल्या जीवनाचा भाग बनेल की, आपल्यावर राज्य करेल, हे आजच्या नियोजनावर अवलंबून आहे.