भारतामध्ये गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम 377 (Section 377) रद्द ठरवत, एक ऐतिहासिक निकाल दिला. एलजीबीटीक्यू (LGBTQ) लोकांसाठी हा दिलासादायक निर्णय होता. मात्र अजूनही समाजाची मानसिकता याबाबत बदलली नाही, म्हणूनच 17 मे रोजी 'इंटरनॅशनल डे अगेन्स्ट होमोफोबिया' (International Day Against Homophobia) साजरा केला जातो. आतापर्यंत समाजाने आपल्याला स्वीकारावे म्हणून अनेक समलैंगिक लोकांनी जगासमोर आपली खरी ओळख मांडली. भारताच्या इतिहासात प्रथमच एका महिला क्रीडापटूने आपण समलैंगिक असल्याची माहिती जगजाहीर केली आहे. द्युती चंद (Dutee Chand) असे या महिला खेळाडूचे नाव असून, भारतातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून तिच्याकडे पहिले जाते. आज द्युतीच्या निर्णयाचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे.
आशियायी खेळांमध्ये भारतासाठी दोन रजत पदक जिंकणाऱ्या, ओडिशाच्या चाका गोपालपूर सारख्या छोट्या गावातील द्युतीने 'द संडे एक्सप्रेस'शी बोलताना आपल्या समलैंगिक संबंधाची कबुली दिली आहे. यावेळी तिने आपण एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासाही केला. आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये म्हणून, तिने मैत्रीणीची ओळख सांगण्यास नकार दिला. मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर द्युतीने एलजीबीटीक्यू लोकांच्या अधिकाराबद्दल आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.
याबाबत ती म्हणते, ‘गेली इतकी वर्षे मी भारतासाठी धावत आहे, या प्रवासात मलाही कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. मला ती व्यक्ती मिळाली आहे, आणि मला तिच्यासोबत राहायचे आहे. समलैंगिक असणे ही माझी वैयक्तिक बाब आहे, त्यात कोणाला काही बोलण्याचा अधिकार नाही. लोकांनी या गोष्टीचा आदर केला पाहिजे. याचा परिणाम माझ्या कामगिरीवर होणार नाही, भारतासाठी मी असेच खेळत राहीन.’ (हेही वाचा: दोन महिला क्रिकेटपटू अडकल्या विवाहबंधनात; पारंपरिक पद्धतीने थाटात पार पडला विवाहसोहळा (पहा फोटो))
दरम्यान, द्युतीने 2018च्या आशियाई स्पर्धेत भारताला दोन रजत पदक मिळवून दिले होते. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता. दरम्यान, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला खेळाडूने अशाप्रकारचा आपण लेस्बियन असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे द्युतीचे हे पाऊल अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे.