World Cup 2019: ऑस्ट्रेलिया दौरा विजयी केल्यानंतर विराटसेना सध्या न्युझीलंड दौऱ्यावर आहे. नेपियर मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्युझीलंडवर 8 विकेट्सने मात केली. नाणेफेक जिंकत न्युझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताने 157 धावात न्युझीलंडचा डाव गुंडाळला. त्यानंतर प्रखर सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबला. मात्र खेळाला सुरुवात होताच भारताने 34.5 ओव्हर्समध्ये केवळ दोन गडी गमावत 158 धावांचे लक्ष्य साध्य केले. (एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी, न्युझिलंडवर 8 विकेटनी मात)
भारताच्या या विजयाचे हिरो ठरले कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी. कुलदीपने चार विकेट्स घेतल्या तर शमीला तीन विकेट्स घेण्यात यश आले. युजवेंद्र चहलने मोक्याच्या वेळी दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्याचा रंग बदलला आणि न्युझीलंडचा धुव्वा उडवला.
खूप काळानंतर भारतीय संघाने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना एकत्र खेळण्याची संधी दिली. दोघांनी मिळून न्युझीलंडचे 7 गडी माघारी पाठवले. हे दोघेही मधल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्यात पटाईत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ नेमका तिथेच कमी पडत होता.
हा आहे X फॅक्टर
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दोघेही रिस्ट स्पिनर्स आहेत. आजकाल फलंदाजांना रिस्ट स्पिनर खेळणे कठीण होते. मधल्या ओव्हरमध्ये विरुद्ध संघाचे बळी घेणाच्या यांच्या क्षमतेने संघाला नक्कीच फायदा होतो. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये ही जोडी कमाल करु शकते.