Virat Kohli वारंवार ऑफ-स्टंपच्या बाहेरील चेंडूवर होतोय आऊट, पण प्रशिक्षक Vikram Rathour म्हणतात तो शॉट खेळून सोडू नको, वाचा सविस्तर
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test 2021: टीम इंडियाचे (Team India) फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर (Vikram Rathour) यांनी कसोटी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ज्या पद्धतीने आऊट होत आहे त्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. विराटला गेल्या दोन वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. तर कव्हर ड्राइव्ह शॉट विराटची एके काळी सर्वात मोठी ताकद होती आणि त्याने या शॉटने खूप धावाही केल्या आहेत, पण काही काळापासून तो या शॉटवर सतत आऊट होत आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीने हा शॉट खेळणे का थांबवू नये, याबाबत राठौर उघडपणे बोलले आहेत. “हा शॉट त्याला खूप धावा मिळवून देतो. त्यामुळे त्याला शॉट खेळावा लागतो. शॉट कधी खेळायचा कोणत्या परिस्थितीत याची चर्चा करावी लागेल,” राठौर यांनी बुधवारी सेंच्युरियनमध्ये  (Centurion) चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. (IND vs SA 1st Test Day 5: सेंच्युरियन येथे रोमांचक पाचव्या दिवसाची सुरुवात; दक्षिण आफ्रिका विजयापासून 211 धावा तर भारत 6 विकेट दूर, कोण जिंकणार अंतिम बाजी?)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात, संभाव्य 8व्या किंवा 9व्या स्टंप चेंडू खेळण्याचा प्रयत्न करताना कोहली बाद झाला. दुसऱ्या डावात पुन्हा दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी त्याच्या या कमजोरीचा फायदा घेतला आणि 33 वर्षीय फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. विराट कव्हर ड्राईव्ह किंवा ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करताना विकेटच्या मागे झेल देत असल्याने फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. राठौर म्हणाले की विराटने तो शॉट खेळत राहिले पाहिजे पण त्यांना वाटते की तुमची मजबूत बाजू काय आहे तीच तुमची कमजोरी देखील बनते.

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे तर चौथ्या दिवसचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताने सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. कोहलीच्या खेळाडूंना सामना जिंकण्यासाठी आता पाचव्या दिवशी 6 विकेट्सची गरज आहे. दरम्यान सामन्याच्या पाचव्या आणि निर्णायक दिवसाचा खेळ सुरु असून कर्णधार डीन एल्गार आणि टेंबा बावुमा यांच्यावर संघाला विजय मिळवून देण्याची मदार असेल. याशिवाय पावसाने खराब खेळ केला नाही, तर गुरुवारी सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.