उत्तराखंडच्या (Uttarakhan) चमोली (Chamoli) जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या वेळी हिमनदीचा काही भाग तुटून नदीत पडल्याने कहर निर्माण झाला आहे. हिमकडा कोसळल्यामुळं पाण्याचा एकच लोट आला, ज्यामध्ये अनेक प्रकल्पांवर काम करणारे मजूरही वाहून गेले, किनाऱ्यालगत असणाऱ्या बहुतांश भागाचंही नुकसान झालं. बचाव टीमने आतापर्यंत 14 लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, परंतु 170 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. या आपत्तीमुळे ऋषी गंगा पॉवर प्रकल्प आणि एनटीपीसी प्रकल्प यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेने भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतला (Rishabh Pant) दुखावला आहे आणि त्याने आता या कठीण परिस्थितीत पीडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पंतने रविवारी सायंकाळी उशिरा याबाबत एक ट्विट केले. (Uttarakhand Flood: नक्की का घडली उत्तराखंड दुर्घटना? कोण जबाबदार? जाणून घ्या काय म्हणतात Environment Experts)
पंतने लिहिले की, "उत्तराखंडमधील जीवितहानीने फार दुःख झाले. मी बचाव कार्यासाठी माझी संपूर्ण मॅच फी देऊ इच्छितो आणि या दु:खाच्या क्षणी लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करतो.'' इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्टच्या पहिल्या डावात रविवारी पंतने संघ अडचणीत करताना 88 चेंडूत 91 धावांची तडाखेदार डाव खेळला. या दरम्यान त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार लगावले. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात पंतच्या तुफानी खेळीने टीम इंडियाचा डाव बर्याच प्रमाणात सावरण्याचा मदत झाली. उत्तराखंडच्या चमोली येथील दुर्घटनेनंतर आता त्याने समोर येत तसाच मदतीचा प्रयत्न केला आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे पंतचा जन्म उत्तराखंडच्या रुड़की येथे झाला आहे.
Deeply pained by the loss of life in Uttarakhand. Would like to donate my match fee for the rescue efforts and would urge more people to help out.
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 7, 2021
दरम्यान, उत्तराखंड येथील घटनेबद्दल बोलायचे तर या विध्वंसानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आद्यपही काही लोक बोगद्यात अडकले असल्याने बोगदा खोदून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एक्सावेटर आणि पोकलँड मशीन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री देखील बचाव कार्य चालू राहण्यासाठी लाईट बसवण्यात आले होते. चामोली जिल्हाधिकाऱ्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले.