मोहम्मद शमी व विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सर्वात महागडा ठरला. त्याने 11.21 च्या इकॉनॉमी रेटने 3.5 षटकात 43 धावा लुटल्या. हीच गोष्ट अनेक क्रिकेट चाहत्यांना खटकली आणि त्यानंतर शमी ऑनलाइन ट्रोल होऊ लागला. या घटनेनंतर आता न्यूझीलंडविरुद्ध आर-पारच्या सामन्यासाठी भारतीय संघ (Indian Team) तयारीला लागला असून सामन्याच्या काही तासांपूर्वी टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला  (Virat Kohli) शमीच्या ऑनलाइन ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, “आम्हाला मैदानावर लक्ष केंद्रित करावे लागेल, आम्हाला बाहेरच्या गोष्टींची पर्वा नाही.” ()

विराट कोहली पुढे म्हणाला, “काही लोक आपली ओळख लपवून असे करतात, कारण त्यांच्यात पुढे येण्याची हिंमत नसते. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण धर्माच्या आधारावर हे सर्व करणे दुर्दैवी आहे, हे सर्वात वाईट कृत्य आहे. धर्म ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे.” पाकिस्तानविरुद्ध या पराभवानांतर सोशल मीडिया यूजर्सने मोहम्मद शमीला जबाबदार धरल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या भारतीय गोलंदाजांला पाठिंबा दर्शवला. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंगसह अनेक माजी खेळाडूंनी शमीला पाठिंबा देत ट्विट केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्रोल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले.

कोहलीने स्पष्टपणे सांगितले की, “कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माच्या आधारे टार्गेट केले जाऊ शकत नाही. मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तरीही त्याच्या खेळात जे पाहायला हवे ते कोणालाही दिसत नाही, म्हणून मी त्याबाबत काहीही करू शकत नाही. तसेच मला अशा लोकांसाठी माझा वेळ वाया घालवायचा नाही. आम्ही शमीच्या पाठीशी 200 टक्के उभे राहू. आणि बाहेरच्या लोकांच्या वर्तनाचा आपल्या संबंधांवर परिणाम होऊ शकत नाही.” दरम्यान टी-20 विश्वचषकाच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना रविवारी (31 ऑक्टोबर) गट 2 मध्ये न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांना आपापल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे आणि हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणे आवश्यक आहे.