गणेश जयंती कधी आहे

मुंबई: हिंदू धर्मात भगवान गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते. दर महिन्याला दोन चतुर्थी येतात, मात्र माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवसाला गणेश जयंती किंवा 'माघी गणेश चतुर्थी' म्हणून ओळखले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, याच दिवशी गणेशाचा जन्म झाला होता. 2026 मध्ये गणेश जयंतीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये संभ्रम असून, पंचांगानुसार याची अचूक माहिती समोर आली आहे.

गणेश जयंतीची अचूक तारीख

Ganesh Jayanti Date- वैदिक पंचांगाच्या गणनेनुसार, 2026 मध्ये माघ शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात 22 जानेवारी रोजी रात्री 2:47 वाजता होईल. या तिथीची समाप्ती 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:28 वाजता होणार आहे. उदयतिथीची मान्यता लक्षात घेता, गणेश जयंती गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.

 गणेश  पूजेचा शुभ मुहूर्त

गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाची पूजा करण्यासाठी दुपारी शुभ वेळ असते. २२ जानेवारी रोजी पूजेचा सर्वात उत्तम मुहूर्त सकाळी 11:28ते दुपारी 1:42 पर्यंत असेल. या 2 तास 14 मिनिटांच्या कालावधीत गणेश पूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

गणेश जयंती साधी आणि सोपी पूजा विधी

गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. एका चौरंगावर लाल कापड अंथरून गणेशाची मूर्ती स्थापित करावी. गणेशाला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करून सिंदूर अर्पण करावा. बाप्पाला प्रिय असणारे 21 दुर्वा आणि लाल फुले अर्पण करावीत. शेवटी मोदक किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवून आरती करावी.

गणेश जयंतीचे महत्त्व आणि परंपरा

या दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हणतात. या दिवशी तिळाचे दान करणे आणि तिळापासून बनवलेले पदार्थ सेवन करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी विधीवत व्रत केल्यास कुंडलीतील बुध दोष दूर होतात आणि ज्ञान व बुद्धीची प्राप्ती होते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी चंद्र पाहिल्यास व्यक्तीवर खोटा आरोप (कलंक) लागण्याची शक्यता असते. त्यामुळे भाविकांनी या दिवशी रात्री चंद्र पाहणे टाळावे.