सहर युनुस शेख

मुंब्रा: मुंब्रा येथील पॅनल क्रमांक 30 मधून विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख ( Sahar Yunus Shaikh Viral Speech) यांनी जाहीर सभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून, ज्यांना वाटत होते की आम्ही कोणाच्या तरी उपकारावर आहोत, त्यांच्या अहंकाराच्या चिंधड्या जनतेने उडवल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुंब्रामधील मतदारांचे आभार मानले.

विजयाचा मार्ग आणि मतदारांचे आभार

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजित केलेल्या आभार सभेत सेहर शेख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. "निवडणूक संपली की लोक आपापल्या कामाला लागतात, पण अल्लाहने आणि इथल्या जनतेने दिलेले प्रेम पाहून असे वाटते की आजही आपण निवडणुकीच्या वातावरणातच आहोत," असे त्या म्हणाल्या. पॅनल 30 मधील प्रत्येक मतदाराने दिलेली साथ आणि विश्वासाची त्यांनी कृतज्ञतापूर्वक दखल घेतली.

'नोटा'च्या ताकदीने विरोधकांना धक्का

या भाषणादरम्यान सेहर शेख यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले, तो म्हणजे 'नोटा' (NOTA) पर्यायाचा वापर. त्यांच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंब्रामध्ये सुमारे 12000 मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे. अनेक प्रस्थापित उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला मिळालेली ही मते विरोधकांसाठी मोठी नामुष्की असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेने या माध्यमातून चुकीच्या नेत्यांना नाकारण्याची ताकद दाखवून दिली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संघर्षाचा काळ आणि पक्षाची साथ

निवडणुकीच्या रणधुमाळीत जेव्हा त्यांचे वडील युनूस शेख रुग्णालयात होते, त्या कठीण काळात एमआयएम पक्षाने आणि विशेषतः शहराध्यक्ष सैफ पठाण यांनी दिलेल्या खंबीर साथीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. "काही लोकांनी आम्हाला आणि माझ्या वडिलांना तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते विसरले की आम्ही वाघाची मुले आहोत," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांना आणि विरोधकांना टोला लगावला.