भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा 113 पेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा अनुभवी खेळाडू आहे पण रविवार, 31 ऑक्टोबरच्या रात्री, न्यूझीलंडविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचे तिसऱ्या क्रमांकावर डिमोशन झाले ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विराट कोहलीच्या टीम इंडियाला (Team India) पाकिस्तान आणि न्यूझीलंड (New Zealand) विरोधात सुरु असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये एकामागोमाग पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर (Vikram Rathour) यांनी खुलासा केला की नियमित सलामीवीराची फलंदाजीची स्थिती बदलण्याचा निर्णय रोहितसह संपूर्ण व्यवस्थापनाचा होता. जखमी सूर्यकुमार यादवच्या जागी ईशान किशनचा (Ishan Kishan) समावेश करण्यात आला होता, पण त्याला चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले नाही आणि त्याऐवजी त्याला सलामीला पाठवण्यात आले. (IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ ठरले भारताच्या पराभवाचे खलनायक, दुसऱ्या पराभवात विराट ब्रिगेडला नडल्या ‘या’ चुका)
“शनिवारी रात्री सूर्याला (सूर्यकुमार यादव) पाठीत दुखापत झाली, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरू शकला नाही. त्याच्या जागी ईशान किशनची निवड करण्यात आली होती. त्यामुळे खुद्द रोहितसह संपूर्ण संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला की किशनने केएल राहुलसोबत फलंदाजीची सुरुवात करावी. डावखुऱ्या फलंदाजासह डावपेचांनी हा निर्णय योग्य ठरला,” राठौर यांनी बुधवारी (3 नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या सामन्यापूर्वी आभासी पत्रकार परिषदेदरम्यान खुलासा केला. टीम इंडियाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे केवळ 150 आणि 110 धावाच करता आल्या आहेत. आपल्या फलंदाजांच्या अपयशाने, विशेषतः हार्दिक पांड्याने संघाला पराभवाच्या छायेत ढकलले.
याशिवाय इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 ही टी-20 विश्वचषकापूर्वीची आदर्श तयारी होती का, असे विचारले असता राठौर म्हणाले, “कोणतीही तयारी ही चांगली तयारी असते. आयपीएल खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. शेवटच्या दोन सामन्यामध्ये आम्ही आमच्या योजना अंमलात आणू शकलो नाही,” राठौर म्हणाले. दोन सामन्यांमध्ये दोन पराभवांसह भारताला आता इतर संघाचे निकाल त्यांच्या बाजूने जावेत अशी इच्छा आहे आणि त्यांना स्वतःचे उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज आहे. बुधवारी अबु धाबी येथे त्यांचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.