IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ ठरले भारताच्या पराभवाचे खलनायक, दुसऱ्या पराभवात विराट ब्रिगेडला नडल्या ‘या’ चुका
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

टी-20 विश्वचषक स्पर्धेत यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या खराब खेळीचे सत्र सुरूच आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या दुसऱ्या सुपर-12 सामन्यात भारताला 8 विकेटने पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यंदाच्या स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सनच्या बाजूने लागला आणि त्याने भारताला पहिले फलंदाजीला बोलावले. न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी भारताच्या ताफ्यात दोन बदल काण्यात आले होते, पण याचा संघाला अधिक फायदा झाला नाही. किवी संघाविरुद्ध भारताच्या पराभवात संघाचे धुरंधर खेळाडू खलनायक बनले. (IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव, हॅटट्रिकसह विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात न्यूझीलंड यशस्वी)

ईशान किशन (Ishan Kishan)

सूर्यकुमार यादवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिलेल्या ईशानला केएल राहुल सोबत सलामीला पाठवण्यात आले होते. सराव सामन्यात जबरदस्त डाव खेळणाऱ्या ईशानकडून आजच्या महत्वाच्या सामन्यात मोठ्या अपेक्षा होत्या पण तो त्या पूर्ण करू शकला नाही. किशन आजच्या सामन्यात सलामीला उतरला पण संघ व्यवस्थापनाचा तो निर्णय फसला. आणि ईशान 8 चेंडूत फक्त 4 धावा करून बाद झाला.

रिषभ पंत (Rishabh Pant)

भारताची आघाडीची फळी स्वस्तात तंबूत परतल्यावर मधल्या फळीत युवा फलंदाज रिषभ पंतवर धावगती वाढवण्याची मोठी जबाबदारी होती. पण त्याने देखील बॅटने निराशाजनक खेळ केला. पंतला देखील किवी गोलंदाजांना खेळण्यात संघर्ष करावा लागला. संघ अडचणीत असताना पंत 19 चेंडूंचा सामना करून फक्त 12 धावाच करू शकला.

शार्दूल ठाकूर (Shardul Thakur)

गेल्या अनेक दिवसांपासून गोलंदाजी अष्टपैलू शार्दूल ठाकूरचा भारतीय इलेव्हनमध्ये समावेश करण्याची मागणी केली जात होती. आणि तो क्षण आला देखील पण तो संधीला साजेशी कामगिरी करू शकला नाही. अंतिम क्षणी शार्दूल फलंदाजीला आला पण तो फक्त तीन बॉल खेळून भोपळा न फोडता चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्यानंतर बॉलने देखील ठाकूर काही कमाल करू शकला नाही. त्याने एक षटक टाकला आणि धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.