भारताविरुद्ध (India) आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील इतिहास कायम ठेवण्यात केन विल्यम्सनचा (Kane Williamson) न्यूझीलंड संघ यशस्वी ठरला आहे. दुबई येथे झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात किवी संघाने भारतीय गोलंदाजांना चोपून काढलं आणि फटाफट क्रिकेटच्या विश्वचषकात भारताला तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली. याशिवाय यंदाच्या स्पर्धेत किवी संघाचा हा पहिला विजय देखील ठरला आहे. टीम इंडियाने (Team India) किवी संघापुढे अवघे 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात विल्यम्सनच्या संघाने 14.3 ओव्हरमध्ये शानदार विजय मिळवला. या पराभवामुळे स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची भारतीय संघाची (Indian Team) वाट बिकट झाली आहे. तर न्यूझीलंडचा (New Zealand) सेमीफायनल फेरी गाठण्याच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. यापूर्व फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताचा डाव 110 धावांवर आटोपला होता. त्यानंतर गोलंदाजही संघाला विजयीरेष ओलांडून देऊ शकले नाही. (IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ ठरले भारताच्या पराभवाचे खलनायक, दुसऱ्या पराभवात विराट ब्रिगेडला नडल्या ‘या’ चुका)
यंदाच्या टी-20 विश्वचषकच्या पहिल्या विजयात न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट आणि गोलंदाजांसह डॅरिल मिशेलने महत्वाचा वाट उचलला. मिशेलने 35 चेंडूत सर्वाधिक 49 धावांचा डाव खेळला. तसेच कर्णधार विल्यम्सन 33 धावा व डेव्हॉन कॉन्वे 2 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, भारतासाठी फक्त जसप्रीत बुमराह दोन विकेट घेत यशस्वी गोलंदाज ठरला. टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर बोल्टने आणि किवी गोलंदाजांच्या हल्ल्यापुढे भारतीय फलंदाजी कोलमडली. भारत नवीन संघ संयोजनासह मैदानात उतरला होता पण त्याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. ईशान किशन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. पण बोल्टने भारताला तिसऱ्या षटकातच पहिला धक्का दिला आणि किशनला 4 धावांवर डॅरिल मिशेलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरही भारताची पडझड सुरूच राहिली. भारताचे धुरंधर फलंदाज किवी गोलंदाजांपुढे अधिक काळ तग धरून खेळू शकले नाही. पण अंतिम क्षणी हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या काही आकर्षक फटकेबाजीमुळे संघाने शंभरी धावसंख्या गाठली. तथापि भारताला किवींविरुद्ध पहिला वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात तो पुरेसा ठरला नाही.
दुसरीकडे, न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामन्यानंतर सेमीफायनलची समीकरणे अधिक रोमांचित झाली आहेत. पाकिस्तान उपांत्य फेरीतच्या उंबरठ्यावर आहे. तर अफगाणिस्तान चार आणि नामिबिया व न्यूझीलंड संघ प्रत्येकी दोन पॉईंटसह सेमीफायनलच्या रेसमध्ये सामील झाले आहेत. याशिवाय भारत आणि स्कॉटलंड संघ अद्याप सापरधेत आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले आहेत. विराट कोहलीच्या टीम इंडियाला यापूर्वी पाकिस्तानकडून सलामीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.