दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/DineshKarthik)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत मंगळवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात गट 1 मधील सुपर 12 सामना खेळला जात आहे. पहिला सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कठोर पाऊल उचलले. संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. कारण खूप धक्कादायक होते. डी कॉक दुखापतग्रस्त नाही किंवा त्याचा फॉर्म खराब नाही, परंतु असे असूनही त्याचा स्वतःच्या इच्छेनुसार प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. डी कॉकने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (CSA) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास नकार दिला. दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी वर्णद्वेष (Racism) विरोधात मैदानात गुडघे टेकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डी कॉकच्या संघातून बाहेर पडण्याचा या निर्णयाशी संबंध जोडला जात आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. (T20 WC 2021, IND vs PAK: सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू गुडघ्यावर बसले, पण पाकिस्तानी खेळाडूंनी केले असे कृत्य)

वेस्ट इंडिजविरुद्ध टॉस दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला संघातील बदलांबद्दल विचारले असता त्याने सांगितले की क्विंटन डी कॉकला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला आहे. डी कॉक न खेळण्यामागे बावुमाने वैयक्तिक कारण दिले. त्याच्या जागी रीझा हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. डी कॉक वेस्ट इंडिजविरुद्ध न खेळणे दक्षिण आफ्रिका संघासाठी मोठा धक्का आहे. टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला होता आणि डी कॉकची बॅट अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध तळपली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत सर्वाधिक 255 धावा केल्या. विंडीजविरुद्ध सामन्यादरम्यान कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेला भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने ट्विट केले आणि म्हटले की क्विंटन डी कॉक आजचा सामना खेळत नसल्याचे कारण त्याने ब्लॅक लाइव्ह्स मॅटर मोहिमेबाबत घेतलेली भूमिका आहे.

दिनेश कार्तिक

जेव्हा ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळ सुरू झाली तेव्हा दक्षिण आफ्रिकी संघाने त्याच्या समर्थानात गुडघे टेकण्यास नकार दिला होता. खुद्द दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी या आंदोलनाचे समर्थन करतो पण प्रत्येक सामन्यात गुडघे टेकून ते दाखवायचे नाही. मात्र आता दक्षिण आफ्रिकन बोर्डाने पाठिंबा जाहीर केला असून आता प्रत्येक सामन्यापूर्वी संघ गुडघ्यावर बसणार असल्याचे निवेदन जाहीर केले आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय खेळाडूही सामन्यापूर्वी गुडघ्यावर बसले होते.