दीपक चाहर (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध कटक वनडे मॅचमध्ये खेळू शकला नाही. आता आणि चाहरच्या फॅन्ससाठी अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. चाहर मार्च-एप्रिल 2020 पर्यंत टीम इंडियातुन बाहेर पडला आहे. दीपकची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. आतापर्यंत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे बाहेर पडले होते. त्याचप्रमाणे आता दीपकही जखमी झाला आहे आणि चार महिन्यांपर्यंत त्याला संघातून बाहेर राहावे लागणार आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीत माहिती देण्यात आली की दीपकला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याची तक्रार आहे. जानेवारीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे निवड प्रमुख एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी सोमवारी दीपकच्या दुखापतीची पुष्टी केली. (IND vs WI 3rd ODI: कटक वनडे मॅचमधून दीपक चाहर आऊट, नवदीप सैनी याचा टीम इंडियात समावेश)

प्रसादने ईएसपीएनक्रिकइन्फोने सांगितले की, “मार्च-एप्रिल पर्यंत मला [चाहरच्या परत येण्याविषयी] माझ्या स्वत: च्या शंका आहेत." “त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूची दुखापत वाढली आहे. तांत्रिकदृष्ट्या, [भारतीय फिजिओ] नितीन पटेल याची तपासणी करू शकतील, परंतु आतापर्यंत ही पाठीच्या दुखापतीची स्थिती आहे.” 27 वर्षीय दीपकने विझागमधील मॅचदरम्यान दुखापतीची तक्रार केली होती, ज्याच्यानंतर नवदीप सैनी याला त्याच्याजागी संघात स्थान  देण्यात आले होते. अशा परिस्थितीत दीपक आयपीएल 2020 मध्ये खेळण्याबाबत शंका आहे.

“दीपकला त्याच्या पाठीच्या खालच्या भागामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आहे.त्याने एनसीएमध्ये आपले पुनर्वसन सुरू केले आहे आणि एप्रिल 2020 पर्यंत फिटनेस परत मिळण्याची शक्यता आहे, 'असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.