Conflict Of Interest च्या नोटीसनंतर कपिल देव यांच्याकडून बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीच्या प्रमुखपदावरून राजीनामा
कपिल देव (Photo Credit: PTI)

शांता रंगास्वामी (Shantha Rangaswamy) नंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनीही क्रिकेट सल्लागार समिती (Cricket Advisory Committee), सीएसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे नीतिशास्त्र अधिकारी न्या. डीके जैन (DK Jain) यांच्याकडून देव यांना हितसंबंधाची नोटीस पाठवल्यानंतर भारताचे विश्वचषक विजयी कर्णधाराने राजीनामा दिला आहे. कपिल यांना सीएसीच्या अन्य दोन सदस्य- अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) आणि शांता रंगस्वामी यांच्यासह मागील दोन आठवड्यांपूर्वी हितसंबंधाची नोटीस पाठवण्यात आली होती. जैन यांनी 28 सप्टेंबर रोजी एक नोटीस पाठवली होती. सध्याच्या भारतीय प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंना त्यांच्यावरील हितसंबंधांवरील आरोपाबाबत 10 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.बीसीसीआयच्या संविधानानुसार कोणतीही व्यक्ती एकावेळी एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही.

रंगस्वामी यांना नोटीस बजावल्याच्या एक दिवसानंतर त्यांनी राजीनामा सबमिट केला. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता (Sanjeev Gupta) यांनी या तिघांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार कपिल हे फ्लडलाइट कंपनीचे मालक आहे, भारतीय क्रिकेट संघटनेचा (आयसीए) सदस्य आहे आणि सीएसीचे सदस्यदाखल आहे. गायकवाड हे आयसीएचे सदस्य आहेत आणि त्यांची स्वतःच्या मालकीची अकादमीदेखील आहे. दुसरीकडे, रंगास्वामीही या दोघांप्रमाणेच आयसीए आणि सीएसीच्या सदस्या आहेत. महत्वाचे म्हणजे, मुख्य प्रशिक्षक निवड होण्यापूर्वी सीओएने देव यांच्या तीन सदस्यीय समितीला मंजुरी दिली होती. नवीन पॅनेल मागील वर्षी अस्तित्त्वात आले होते. त्यांनी प्रथम डब्ल्यूव्ही रमण यांची भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली. आणि यंदा ऑगस्टमध्ये रवि शास्त्री यांना पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपदावर कायम ठेवले.

या तिघांनीही सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्याजागी सीएसी सदस्य म्हणून जागा घेतली होती. तिन्ही माजी क्रिकेटपटू आयपीएलच्या फ्रँचायझींमध्ये वेगवेगळी भूमिका बजावतात. सचिन मुंबई इंडियन्स संघाचे आयकन आहे, तर गांगुली आणि लक्ष्मण अनुक्रमे दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक आहेत. लक्ष्मण हा स्टार्ट स्पोर्ट्सचा पूर्णवेळ कॉमेंटेटर आणि क्रिकेट तज्ञ देखील आहे.