IPL 2022 Mega Auction: भारतीय अंडर-19 विश्वविजेता संघातील 8 खेळाडूंना ‘या’ कारणामुळे लिलावासाठी नाही केले शॉर्टलिस्ट, वाचा सविस्तर
भारत U19 क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: भारताच्या युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला आणि देशासाठी रेकॉर्ड पाचवे विजेतेपद पटकावले. यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वात भारताच्या अंडर-19 संघाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखले आणि ट्रॉफी उचलून अखेर पर्यंत अपराजित राहिले. अंडर-19 विश्वचषक स्पर्धा युवा खेळाडूंना खेळाडूंना जागतिक मंचावर चमकण्यासाठी एक व्यासपीठ देते. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) भारताच्या U-19 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य लक्ष वेधून घेतील अशी अपेक्षा आहे. पण त्या संघातील तब्बल 8 खेळाडूंना दोन दिवसीय लिलावासाठी शॉर्टलिस्ट केले गेले नसल्याचे समोर आले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, WC विजेत्या संघातील 8 खेळाडू - शेख रशीद, दिनेश बाना, रवी कुमार, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अंगक्रिश रघुवंशी, मानव पारख आणि गर्व सांगवान - या अंडर-19 स्टार खेळाडूंना मेगा लिलावासाठी निवडण्यात आले नाही. आणि यामागचे कारण म्हणजे ते आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळले नाही. (IPL 2022 Auction Date and Time: इंडियन प्रीमियर लीग खेळाडूंच्या लिलावाची तारीख, वेळ आणि सर्वकाही जाणून घ्या)

आयपीएलच्या लिलावात उतरण्यासाठीच्या नियमानुसार लिलावाचा भाग होण्यासाठी खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. वरील 8 खेळाडूंनी लिस्ट ए किंवा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला नसल्यामुळे ते स्पर्धेसाठी नावनोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 8 सदस्य यावर्षी IPL खेळण्यापासून मुकणार आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहे. 18 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघाकडून 2 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएल 2022 मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझी या कार्यक्रमाचा भाग बनणार आहेत.

लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडे 47.5 कोटी रुपये आहे तर पंजाब किंग्स सर्वाधिक 72 कोटी रुपयांची पर्स घेऊन लिलावात प्रवेश करतील. दरम्यान बीसीसीआयने पुष्टी केली आहे की ते भारतात या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. नुकतंच स्पोर्टस्टारशी बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, बोर्ड महाराष्ट्रात सामने आयोजित करण्याचा विचार करत आहे.